मुखॆ मन्दहासं नखॆ चन्द्रभासम्
करॆ चारुचक्रं सुरॆशादिवन्द्यम् ।
भुजङ्गॆ शयानं भजॆ पद्मनाभम्
हरॆरन्यदैवं न मन्यॆ न मन्यॆ ॥ १६ ॥
भगवान श्रीविष्णूंच्या अलौकिक वैभवाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
मुखॆ मन्दहासं – भगवंताच्या मुखावर मंद हास्य विलसत आहे.
जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो. त्यानंतर त्या गोष्टींत आपल्याला हवे ते यश मिळते. किंवा सुरू केलेल्या योजना आपल्याला पाहिजे तशा चालत राहतात, त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता येते, जे आनंदाची प्रकटीकरण होते, त्याला मंद हास्य म्हणतात.
भगवंताच्या बाबतीत यशस्विता कायमची असल्याने, विश्वातील प्रत्येक घटना त्यांच्याच इच्छेने चालत असल्याने, भगवंताच्या मुखावर कायमच हे मंद हास्य विलसत असते.
नखॆ चन्द्रभासम् – भगवंताच्या नखांवर चंद्राचे तेज चमकत असते.
नखे आणि केस या दोन गोष्टी मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या गोष्टी मुळापाशी सजीव आहेत तर बाहेर निर्जीव आहेत.
त्यामुळे केस कापले तर आग होत नाही पण ओढले तर होते.
भगवंताच्या नखातही चंद्राची प्रभा वर्णन करताना त्या निर्जीव अवस्थेत देखील चैतन्याचे वर्णन आचार्य करीत आहेत. मग प्रत्यक्ष भगवंताच्या ठिकाणचे चैतन्य कसे असेल याचा विचारच करावा?
करॆ चारुचक्रं – भगवंताच्या हातात सुदर्शन चक्र आहे. गंमत म्हणजे ते भगवंताच्या हातात आहे तोपर्यंतच सु- दर्शन आहे. ते भगवंतांच्या हातातून सुटले की विनाशकारी आहे.
आपल्या जीवनाचीही हीच रचना असायला हवी. ते भगवंताच्या हातात म्हणजे त्याच्या इच्छेनुसार चालले की सुंदर राहते.
सुरॆशादिवन्द्यम् – सुर म्हणजे देवता. त्यांचे ईश म्हणजे राजे. अर्थात देवराज इंद्र. त्यांनी सर्व देवतांसह वंदन केलेले ते सुरॆशादिवन्द्यम् ।
भुजङ्गॆ शयानं – शेषावर शयन करणार्या,
भजॆ पद्मनाभम् – ज्यांच्या नाभीतून कमल उत्पन्न झाले आहे अशा,
हरॆरन्यदैवं न मन्यॆ न मन्यॆ – भगवान श्रीविष्णू याशिवाय दैवताला मी मानत नाही .मानत नाही.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply