विशुद्धं शिवं शान्तमाद्यन्तशून्यम्
जगज्जीवनं ज्यॊतिरानन्दरूपम् ।
अदिग्दॆशकालव्यवच्छॆदनीयम्
त्रयी वक्ति यं वॆद तस्मै नमस्तॆ ॥ २ ॥
प्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव.
भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात,
विशुद्धं – परम शुद्ध असणारे. मायामल विरहित.
शिवं – शिव शब्दाचा अर्थच आहे पवित्र. मंगलाचे अधिष्ठान असणारे भगवान श्री विष्णू मंगलायतन आहेत.
शान्तम् – माणसाला जेव्हा काही मिळवायचे असते किंवा त्याच्या मनाच्या विरुद्ध काही घडते त्यावेळी तो अशांत होतो.
भगवंताला काहीही मिळवायचे नाही. त्यांच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही. त्यामुळे ते परम शांत असतात. निश्चल असतात. आनंदी असतात.
आद्यन्तशून्यम् – आदी आणि अंत विरहित. शाश्वत. चिरंतन.
विश्वातील प्रत्येक गोष्ट कधीतरी सुरू होते आणि कधीतरी नष्ट होते. मात्र या दोन्हींच्या अतीत असणारे तत्व आहे भगवान.
जगज्जीवनं – सगळ्या जगाला जीवन अर्थात चैतन्य प्रदान करणारे. विश्वाच्या प्रत्येक कार्याच्या मागे असणारे चैतन्य भगवंताचे असते.
ज्यॊतिरानन्दरूपम् – ज्योती म्हणजे चैतन्य आणि आनंद हेच त्यांचे स्वरूप आहे असे.
अदिग्दॆशकालव्यवच्छॆदनीयम् –
जगातील प्रत्येक गोष्ट दिशा,देश म्हणजे स्थान आणि काल ज्यांनी मर्यादित असते.
माझ्या पूर्वेला असणारी गोष्ट पश्चिमेला नसते. एका गावात असणारी व्यक्ती दुसऱ्या गावात नसते. आज असणारी व्यक्ती पाचशे वर्षांपूर्वी नसते. मात्र अशा कोणत्याच मर्यादा भगवंताला नसतात.
भगवान सर्वच दिशांमध्ये व्याप्त आहे. सर्वच स्थानी त्यांचे अस्तित्व आहे. प्रत्येक काळात
ते तत्त्व आहेच आहे. या स्वरूपाच्या मर्यादांच्या पलीकडे ते तत्त्व असल्याने त्यांना अदिग्दॆशकालव्यवच्छॆदनीयम् असे म्हणतात.
त्रयी वक्ति यं वॆद तस्मै नमस्तॆ – तीनही वेद ज्यांना परब्रह्म म्हणते त्यांना नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply