महायॊगपीठॆ परिभ्राजमानॆ
धरण्यादितत्वात्मकॆ शक्तियुक्तॆ ।
गुणाहस्करॆ वह्निबिम्बार्कमध्यॆ
समासीनमॊंकर्णिकॆऽष्टाक्षराब्जॆ ॥ ३ ॥
भगवान श्रीविष्णूंचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
महायॊगपीठॆ – भगवंताचे निवासस्थान असणाऱ्या वैकुंठाला महायोगपीठ असे म्हणतात. महायोगा च्या द्वारे ते पीठ म्हणजे स्थान प्राप्त होते.
भगवान श्री पांडुरंगाच्या स्तोत्रात देखील आचार्य श्री श्रीक्षेत्र पंढरपूर ला याच नावाने संबोधितात.
परिभ्राजमानॆ – सर्व प्रकाशित गोष्टींना प्रकाश प्रदान करणारे. आपल्या शक्तीने या अनंत कोटी ब्रह्मांडाचा पसारा चालवणारे.
धरण्यादितत्वात्मकॆ – पृथ्वी इत्यादी म्हणजे पाचही महाभूतांच्या ठाई व्याप्त असणारे मूळ चैतन्य.
पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्व तत्त्वांना चालवणारी मूळ शक्ती.
शक्तियुक्तॆ – सर्व प्रकारच्या शक्ती अर्थात सत्तांचा मूळ स्रोत. ज्यांच्या शक्तीने हे सर्व चालते असे.
गुणाहस्करॆ – सत्व, रज, तम या तीन गुणांना, या विश्वात असणाऱ्या समस्त सदगुणांना प्रकाशित करणारे.
वह्निबिम्बार्कमध्यॆ – अग्नि तथा सूर्यबिंब इ. समस्त तेजस्वी गोष्टीच्या मागे असणारे मूळ तेज. वास्तव चैतन्य.
समासीनमॊंकर्णिकॆऽष्टाक्षराब्जॆ – ॐकाराने युक्त असणार्या आठ पाकळ्यांच्या कमळात, अष्टधा प्रकृती मध्ये अंतर्हित चैतन्य.
या विश्वातील प्रत्येक गोष्ट पंचमहाभूत आणि तीन गुण अशा आठ गोष्टींनी बनलेली असते. यालाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. या आठ गोष्टींनी युक्त असणारे कमळ म्हणजे जणू ही सृष्टी. तेच ज्यांचे आसन आहे असे. अर्थात यावर त्यांची सत्ता चालते असे.
अशा भगवान वैकुंठनाथ श्रीहरींना नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply