समानॊदितानॆकसूर्यॆन्दुकॊटि-
प्रभापूरतुल्यद्युतिं दुर्निरीक्ष्यम् ।
न शीतं न चॊष्णं सुवर्णावभातम्
प्रसन्नं सदानन्दसंवित्स्वरूपम् ॥ ४ ॥
भगवान श्रीविष्णूच्या अतीव आनंददायी स्वरुपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
समानॊदितानॆकसूर्यॆन्दुकॊटि-
समान म्हणजे सारखे, उदित म्हणजे उगवणाऱ्या, अनेक कोटी म्हणजे अगणित सूर्य, इंदू म्हणजे चंद्रा प्रमाणे.
अर्थात एकाच वेळी कोट्यावधी सूर्य उगवले तर त्यांचा प्रकाश इतका तेजस्वी असेल तसे तेजस्वी असणारे. आणि त्याच वेळी चंद्राचे ही वर्णन केले. कारण केवळ अनंत कोटी सूर्य प्रकटले तर ते तेज अधिक दाहक होईल. मात्र भगवंताच्या स्वरूपामध्ये सूर्याच्या तेजाचा विचार आहे मात्र त्यातील दाहकता नाही. उलट ते तेज चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहे हे सांगण्यासाठी आचार्य सूर्याच्या सोबत चंद्राचा ही उल्लेख करतात.
प्रभापूरतुल्यद्युतिं- त्या प्रभा म्हणजे तेजाप्रमाणे ज्यांची अतुल्य अतुलनीय तेजस्विता आहे असे.
दुर्निरीक्ष्यम् – त्या तेजामुळे ज्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहता येत नाही असे.
न शीतं न चॊष्णं – ना शीत असलेले ना उष्ण असलेले. कोणत्याच बाजूचा त्रास नसलेले. समतोल.
सुवर्णावभातम् – सोन्याप्रमाणे लखलखित.
प्रसन्नं – अतीव प्रसन्न.
सदानन्दसंवित्स्वरूपम् –
सदैव व आपल्याच आनंदात असणारे.
सदैव जाणीव अर्थात अस्तित्व स्वरुपात विद्यमान असणाऱ्या,
ज्यांना भूत भविष्य वर्तमान अशा काळाचे बंधन पडत नाही असे. सदैव आहेतच आहेत असे. त्याच सोबत ज्ञान हे त्यांचे स्वरूप आहे असे. परम चैतन्य युक्त.
त्याच सोबत सत् आनंद संवित् चा एकत्र अर्थ केला तर सच्चिदानंद स्वरूप असणारे.
भगवान श्रीविष्णूंना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply