सुनासापुटं सुन्दरभ्रूललाटम्
किरीटॊचिताकुञ्चितस्निग्धकॆशम् ।
स्फुरत्पुण्डरीकाभिरामायताक्षम्
समुत्फुल्लरत्नप्रसूनावतंसम् ॥ ५ ॥
भगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
सुनासापुटं – भगवंताची नासिका अतीव सुंदर आहे.
जेव्हा आपण कुणाच्या चेह-याकडे पाहतो यावेळी सर्वप्रथम दिसणारा अवयव म्हणजे नासिका.
इतर सर्व अवयवांच्या पेक्षा तो पुढे आहे. त्यामुळे तो सर्वप्रथम दिसतो असा भाव.
त्यामुळे आचार्य सर्वप्रथम त्या सर्व मनोहर नासिकेचे वर्णन करीत आहेत.
सुन्दरभ्रू – भगवंताच्या भुवया अत्यंत कमनीय आहेत. त्यांचा डौल आणि नाजूकपणा त्यात अपेक्षित आहे.
ललाटम् – त्यानंतर लक्ष जाणारा अवयव म्हणजे कपाळ. भगवंताचे हे ललाट अत्यंत आकर्षक आहे.
त्यामुळे भुवई आणि ललाट या दोन्ही करता आचार्यांनी सु अर्थात अत्यंत सुंदर या उपसर्गा चा उपयोग केला आहे.
किरीटॊचिताकुञ्चितस्निग्धकॆशम् ।
किरीट अर्थ डोक्यावर धारण करणाऱ्या मुकुटाला योग्य असणारे अ से कुंचित अर्थात कुरळे आणि स्निग्ध म्हणजे तैलपूर्ण, आकर्षक असे भगवंताचे केस आहेत.
केसाचा काळेपणा जितका महत्त्वाचा वर्णिला आहे तितकाच त्यातील स्निग्धता भाव महत्त्वाचा आहे. कोरडे राठ केस आकर्षक नसतात.
त्या केसांच्या कुरळेपणाने मुख कमलाला जणूकाही एक महिरप प्राप्त झाली आहे.
स्फुरत्पुण्डरीकाभिरामायताक्षम् –
त्यानंतर लक्ष जाणारा अवयव म्हणजे डोळे. आचार्य त्यासाठी शब्द वापरतात, स्फुरत म्हणजे उमललेल्या, पुंडरीक म्हणजे कमळाप्रमाणे, अभिराम म्हणजे आकर्षक असणारे, आयत म्हणजे लांब असे ज्यांचे डोळे आहेत असे.
समुत्फुल्लरत्नप्रसूनावतंसम् –
चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply