सुरत्नाङ्गदैरन्वितं बाहुदण्डैः
चतुर्भिश्चलत्कङ्कणालंकृताग्रैः ।
उदारॊदरालंकृतं पीतवस्त्रम्
पदद्वन्द्वनिर्धूतपद्माभिरामम् ॥ ७ ॥
भगवान श्री वैकुंठनाथांच्या अनुपमेय सौंदर्याचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
सुरत्नाङ्गदैरन्वितं बाहुदण्डैः
सुंदरा रत्न जडवलेल्या अंगद म्हणजे बाजूबंदांनी भगवंताच्या हाताचे दंड अलंकृत झालेले आहेत.
अर्थात त्यांनी विविध रत्नांनी अलंकृत असलेले बाजूबंद धारण केलेले आहेत.
चतुर्भिश्चलत्कङ्कणालंकृताग्रैः –
चलत् अर्थात सतत हालचाल करणाऱ्या कंकण म्हणजे हातातील कड्यांनी भगवंताचे चारही हात अलंकृत झालेले आहेत.
अर्थात भगवंताच्या मनगटात अतीव सुंदर अशी कंकणे आहेत. ती सतत घालताहेत या वाक्यात भगवंताच्या सातत्यपूर्ण कृतीचा विचार अपेक्षित आहे.
भगवंताचे चार हात म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ. या चारही बाबतीत अत्यावश्यक असणारी सातत्यपूर्ण कृती त्यातून प्रदर्शित होत आहे.
उदारॊदरालंकृतं पीतवस्त्रम् –
भगवंताच्या उदराला अर्थात पोटाला, पीत वस्त्राने अलंकृत केलेले आहे. भगवंतांनी पीतांबर धारण केलेला आहे.
पदद्वन्द्वनिर्धूतपद्माभिरामम् –
पद्म म्हणजे कमळाच्या अभिराम म्हणजे सौंदर्याला धुवून टाकणारे अर्थात नष्ट करणारे भगवंताची चरणकमले आहेत.
या शब्दावलीत पद्म आणि अभिराम अशी फोड केली तर वरील अर्थ लागू पडतो.
मात्र त्याच वेळी पद्माभिराम या शब्दाची पद्मा आणि अभिराम अशीदेखील फोड होऊ शकते. अशी फोड केली तर,
पद्मा म्हणजे देवी लक्ष्मीने धुतलेली अर्थात सेवा केलेली भगवंतांची चरणकमले अत्यंत अभिराम अर्थात आकर्षक आहेत. असा अधिक सुंदर अर्थ प्रगट होतो.
महापुरुषांच्या शब्दांच्या मागून अर्थ धावत राहतात, त्याचे हे सुंदर उदाहरण.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply