श्रिया शातकुंभद्युतिस्निग्धकान्त्या
धरण्या च दूर्वादलश्यामलाङ्ग्या ।
कलत्रद्वयॆनामुना तॊषिताय
त्रिलॊकीगृहस्थाय विष्णॊ नमस्तॆ ॥ ९ ॥
या संसारातून तारून नेणाऱ्या भगवंताच्या स्वत:च्या आगळ्यावेगळ्या संसाराचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
श्रिया शातकुंभद्युतिस्निग्धकान्त्या
शात कुंभ अर्थात सोने. त्याची द्युती म्हणजे चमक. तशा उज्ज्वलतेने, तेजस्वीपणाने स्निग्ध म्हणजे आकर्षक असणाऱ्या. श्रिया म्हणजे वैभव आणि युक्त असणार्या. कांता अर्थात पत्नीने.
सगळ्याचा एकत्रित विचार केला तर देवी लक्ष्मीने.
भगवंताच्या संसारातील एका बाजूला देवी लक्ष्मी आहे. जी सुवर्ण प्रभा मंडित आहे. तर दुसर्या बाजूला,
धरण्या च दूर्वादलश्यामलाङ्ग्या – दूर्वादला प्रमाणे शामल अर्थात सावळ्या रंगाने युक्त असणारी धरणी म्हणजे भूमी आहे.
वास्तविक दूर्वेचा रंग हिरवा असतो. पण खूप लांबवर पसरलेल्या दूर्वा जेव्हा आपण दुरून पाहतो त्यावेळी त्यांचा रंग निळसर काळा दिसतो. त्याला दूर्वादलश्याम असे म्हणतात.
भगवंताची दुसरी पत्नी अर्थात भूमी माता आशा रंगाची आहे.
कलत्रद्वयॆनामुना तॊषिताय
– अशा दोन पत्नीच्या द्वारे संतुष्ट असलेले.सेवा केली गेलेले.
त्रिलॊकीगृहस्थाय – गृहस्थ म्हणजे संसारी. जो घरात राहतो तो गृह- स्थ.
तिथे भगवंताला त्रिलोकी गृहस्थ असे म्हटले आहेत.
अर्थात हे संपूर्ण ब्रह्मांड, स्वर्ग मृत्यु पाताळ हे तिन्ही लोक जणू भगवंताचे घर आहे.
“एक”मेव अद्वितीय असलेले भगवान, आपल्या “दोन” पत्नीसह, अशा “तीन” लोकांच्या घरात राहतात.
विष्णॊ नमस्तॆ – अशा भगवान विष्णूंना मी वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply