लक्ष्मीभर्तुर्भुजाग्रे कृतवसति सितं यस्य रूपं विशालं
नीलाग्रेस्तुङ्गशृंगस्थितमिव रजनीनाथबिम्बं विभाति ।
पायान्नः पाञ्चजन्यः स दितिजकुलत्रासनैः पूरयन् स्वैः
निर्ध्वानैर्नीरदौघध्वनिपरिभवदैरम्बरं कम्बुराजः ॥१॥
भगवान श्रीवैकुंठनाथांच्या आळवणी साठी आचार्य श्री निर्माण केलेल्या विविध स्तोत्रां पैकी हे अत्यंत रमणीय स्तोत्र. त्याच्या नावातच त्याचे स्वरूप स्पष्ट होते. भगवंताच्या चरण कमला पासून केशसंभारा पर्यंत प्रत्येक गोष्टीचे यात वर्णन केले आहे.
भगवंताच्या या दिव्य स्वरुपाचे वर्णन करण्यापूर्वी प्रथम श्लोकात आचार्य श्री त्यांच्या हातातील शंखाचे वर्णन करीत आहेत. त्याची दोन महत्त्वपूर्ण कारणे आहेत.
एक तर लांबून भगवंताच्या जवळ येताना सर्वप्रथम त्यांनी उंच केलेल्या हातातील पांचजन्यच आपल्याला दिसणार आहे. दुसरी गोष्ट भगवंताचे रूप दिसण्यापूर्वी या पांचजन्याचा ध्वनी कानावर येणार आहे.
त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
लक्ष्मीभर्तुर्भुजाग्रे कृतवसति – श्री महालक्ष्मीचे पती असणाऱ्या भगवान विष्णूच्या हातात निवास करणारा,
सितं – पांढराशुभ्र असणाऱ्या
यस्य रूपं विशालं – ज्याचे रूप अत्यंत विशाल आहे अशा,
नीलाग्रेस्तुङ्गशृंगस्थितमिव रजनीनाथबिम्बं विभाति – घनश्याम भगवंताच्या हातात पांढराशुभ्र असणारा शंख जणू काही नील पर्वतावर उगवलेल्या पांढर्या शुभ्र चंद्रबिंब प्रमाणे दिसतो.
पायान्नः पाञ्चजन्यः स – तो पांचजन्य आमचे रक्षण करो. दितिजकुलत्रासनैः – दितिचे पुत्र असणारा दैत्यांनी त्रास दिलेल्या
पूरयन् स्वैः
निर्ध्वानैर्नीरदौघध्वनिपरिभवदैरम्बरं – आकाशाला भरून टाकणाऱ्या स्वतःच्या आवाजाने पळवून लावून पराभव करणाऱ्या,
कम्बुराजः – शंखांचा सम्राट पांचजन्य आमचे रक्षण करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply