यस्मादाक्रामतो द्यां गरुडमणिशिलाकेतुदण्डायमाना-
दाश्च्योतंती बभासे सुरसरिदमला वैजयन्तीव कान्ता ।
भूमिष्ठो यस्तथान्यो भुवन्गृहबृहत्स्तंभशोभां दधानः ।
पातामेतौ पयोदोदर ललिततलौ पंकजाक्षस्य पादौ ॥१२॥
महाराज बलीने तीन पाऊले भूमीचे दान दिल्यानंतर वामन रूपधारी भगवान विष्णूंनी त्याला दिव्य दृष्टी दिली. एका पावलाने संपूर्ण स्वर्ग तर दुसऱ्या पावलाने संपूर्ण पृथ्वी आच्छादित केली. त्या प्रसंगाचे वर्णन करीत आचार्य श्री भगवान विष्णूच्या चरणकमलांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
यस्मादाक्रामतो द्यां गरुडमणिशिलाकेतुदण्डायमाना- स्वर्गाला गवसणी घालण्यासाठी वाढवलेले चरणकमल गरुडमणी अर्थात चमकदार रत्नांनी सजवलेल्या राजदंडा प्रमाणे शोभून दिसत होते.
दाश्च्योतंती बभासे सुरसरिदमला वैजयन्तीव कान्ता – त्या पायाने आकाशातील ब्रम्हांडाचे कवच भेदल्याने तेथील पाणी गंगा स्वरूपात वाहू लागल्याने त्या प्रवाहाला जणू भगवंताच्या गळ्यातील वैजयंती माळेचे सौंदर्य प्राप्त झाले.
जशी भगवंताच्या गळ्यात ती माळ शोभते तशी गंगा चरणकमला भोवती शोभू लागली.
भूमिष्ठो यस्तथान्यो भुवन्गृहबृहत्स्तंभशोभां दधानः – दुसरे पाऊल म्हणजे जणूकाही ही या विश्वाचा आधारस्तंभ असल्या प्रमाणे शोभा धारण करीत होते.
अर्थात या पावलांने सगळ्या पृथ्वीला आधार दिलेला होता.
पातामेतौ पयोदोदर ललिततलौ पंकजाक्षस्य पादौ – मेघाच्या आतील भागाप्रमाणे जल म्हणजे जीवन पूर्ण असणारे, घनश्याम आणि विद्युत तेजाने चमकणारे, अत्यंत सुंदर असे ते कमलाक्ष भगवान विष्णूंचे चरणकमल आमचे संरक्षण करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply