विष्णोः पादद्वयाग्रे विमलनखमणिभ्राजिता राजते या
राजीवस्येव रम्या हिमजलकणिकालंकृताग्रा दलाली ।
अस्माकं विस्मयार्हाण्यखिलमुनिमनःप्रार्थनीयानि सेऽयं
दद्यादाद्यानवद्या ततिरतिरुचिरा मंगलान्यंगुलीनाम् ॥१५॥
भगवान श्रीविष्णूंच्या चरणतलाचे वर्णन केल्यानंतर आता आचार्यश्री त्या चरणाला असणाऱ्या अनुपमेय अंगुलींचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
विष्णोः पादद्वयाग्रे – भगवान श्री विष्णूंचा दोन्ही चरणांच्या अग्रभागी असणाऱ्या, विमलनखमणिभ्राजिता राजते या – अत्यंत विलोभनीय नख रूपी रत्नांनी शोभायमान असणाऱ्या, भगवंताच्या नखांची प्रदीप्तता जणू काही रत्नप्रभेला पराजित करीत आहे अशी रम्य कल्पना आचार्य मांडत आहेत.
राजीवस्येव रम्या – कमळाप्रमाणे रमणीय असणाऱ्या, हिमजलकणिकालंकृताग्रा दलाली – त्यांच्या दल म्हणजे त्या चरणरुपी कमळाच्या पाकळ्याच्या रांगेप्रमाणे असणाऱ्या, त्यावर दवबिंदू पडल्यानंतर त्या पाकळ्या जशा अधिकच मनोहारी होतात तशा स्वरूपात असणाऱ्या,
चरण ही कमल आहे, त्याची बोटे त्या कमळाच्या पाकळ्या आहेत ही कल्पना अत्यंत रमणीय आहे. एखाद्या महाकवींच्या काव्यात शोभण्यासारखी आहे.
अस्माकं विस्मयार्हाण्यखिलमुनिमनःप्रार्थनीयानि सेऽयं – आमच्यासाठी तसेच सर्व ऋषीमुनींच्या साठी विस्मयचकीत होण्याचे स्थान असणाऱ्या, अर्थात त्याच्या दर्शनाने सर्व विस्मयचकित होतात अशा, मनोमन सतत ते सर्व ऋषिमुनी ज्याची प्रार्थना करीत असतात अशा,
दद्यादाद्यानवद्या ततिरतिरुचिरा मंगलान्यंगुलीनाम् – अत्यंत मंगल असणाऱ्या त्या अंगुली आम्हाला तात्काळ अत्यंत सुंदर असणाऱ्या, विलोभनीय सुख देणाऱ्या सर्व बाबी प्रदान करोत.
अर्थात जो या चरणांगुलींचे चिंतन करतो त्याला सर्व सुखदायक गोष्टी सहज उपलब्ध होतात.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply