यस्या दाम्ना त्रिधाम्नो जघनकलितया भ्रजतेऽङ्गं यथाब्धेः
मध्यस्थो मन्दराद्रिर्भुजगपतिमहाभोगसंनद्धमध्यः
काञ्ची सा काञ्चनाभा मणिवरकिरणैरुल्लसद्भिः प्रदीप्ता
कल्यां कल्याणदात्री मम मतिमनिशं कम्ररूपा करोतु ॥२२॥
भगवान श्रीहरीच्या पीतांबरा चे वर्णन केल्यानंतर त्यावर कसलेल्या कंबरपट्ट्याकडे स्वाभाविकच लक्ष जाते. भगवान श्रीहरीच्या कमरेवर विराजमान त्या दिव्य मेखाले चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री करीत आहेत.
विष्णू शब्दाचा अर्थच परम व्यापक असा आहे. त्यामुळे भगवंताचे वर्णन करताना सगळ्याच गोष्टी अति भव्यदिव्य स्वरूपात वर्णन केल्या जातात.
मेखले चे वर्णन करताना अशा स्वरूपातील सर्वात विशाल मेखला कोणती? असा विचार करणाऱ्या आचार्य श्रींच्या प्रतिमेसमोर दृश्य साकारले ते समुद्रमंथनाचे.
समुद्रमंथन करण्यासाठी रवी म्हणून मंदर नावाच्या महान पर्वताला स्थापन करण्यात आले. तर दोरी म्हणून वासुकी सर्पाला उपयोगात आणले गेले. त्या संपूर्ण पर्वताला आणि आजूबाजूला असणाऱ्या संपूर्ण समुद्राला आपल्या विशाल तनुने आच्छादित करणाऱ्या त्या वासुकी ची उपमा आचार्य श्री देत आहेत. ते म्हणतात,
यस्या दाम्ना त्रिधाम्नो जघनकलितया भ्रजतेऽङ्गं यथाब्धेः – ज्याच्या दोरी स्वरूपाने संपूर्ण समुद्राचे अंग व्यापलेले होते,
मध्यस्थो मन्दराद्रिर्भुजगपतिमहाभोगसंनद्धमध्यः – मध्ये असलेल्या मंदर पर्वताला व्यापलेल्या त्या भुजगपती वासुकी प्रमाणे असणारी, भगवंताच्या समुद्राप्रमाणे विशाल निळ्या काळ्या शरीरावर लखलखणारी,
काञ्ची सा काञ्चनाभा – सोन्याची तेजस्वी असलेली ती मेखला, मणिवरकिरणैरुल्लसद्भिः प्रदीप्ता – तिच्यावर लावलेल्या असंख्य रत्नांच्या प्रभेने अति उज्वल दिसत आहे.
कल्यां कल्याणदात्री मम मतिमनिशं कम्ररूपा करोतु – अत्यंत निर्दोष असणारी, भक्तांना कल्याण प्रदान करणारी, ती मेखला माझी सतत कल्याण करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply