कान्त्यंभ:पूरपूर्णे लसदसितवली भंगभास्वतरङ्गे
गम्भीरावर्तनाभीचतुरतरमहावर्तशोभिन्युदारे ।
क्रीडत्वानद्धहेमोदरनहनमहाबाडवाग्निप्रभाढ्ये
कामं दामोदरीयोदरसलिलनिधौ चित्तहंसश्चिरं नः ॥२५॥
भगवान श्री विष्णूच्या नाभीकमलाचे वर्णन केल्यानंतर, त्यातून उत्पन्न झालेल्या भगवान ब्रह्मदे वांचे जन्मस्थान असलेल्या कमळाचे वर्णन केल्यानंतर, भगवंताच्या संपूर्ण उदराचे एकत्रित स्वरूपातील वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत. ते म्हणतात,
कान्त्यंभ:पूरपूर्णे – त्यांच्या शरीरकांतीने परिपूर्ण समुद्राप्रमाणे भासणारे,
भगवंताचे शरीर निळ्या रंगाचे आहे. ते अतिविशाल असल्याने त्याचा अंतपार नजरेच्या टप्प्यात येत नाही. त्यामुळे जणू काही भगवंताचे ते शरीर एखाद्या विशाल पसरलेल्या समुद्राप्रमाणे आहे असे आचार्य म्हणत आहेत.
लसदसितवली – भगवंताच्या उदरावर तीन वळ्या शोभून दिसत आहेत. यालाच त्रिवलीशोभित असे म्हणतात.
भगवंताच्या सगुण साकार रूपात चालत असणाऱ्या श्वासोच्छ्वासामुळे या वळ्या हलत आहेत.
भंगभास्वतरङ्गे – त्यामुळे त्या जणू काही लाटांप्रमाणे वाटत आहेत.
ही उपमा अत्यंत नयनमनोहर आहे.
गम्भीरावर्तनाभीचतुरतरमहावर्तशोभिन्युदारे – भगवंताची अत्यंत गंभीर असलेली नाभी एखाद्या विशाल भोवऱ्याप्रमाणे वाटत आहे.
क्रीडत्वानद्धहेमोदरनहनमहाबाडवाग्निप्रभाढ्ये – त्या कमरेचा भोवताल गुंडाळेला पितांबर जणु काही महान वडवाग्नीप्रमाणे तेजस्वी वाटत आहे.
कामं दामोदरीयोदरसलिलनिधौ चित्तहंसश्चिरं नः – अशा त्या दामोदर भगवान श्रीहरीच्या उदर रुपी सागरामध्ये आमचा मानस रूपी हंस सदैव विहार करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply