नाभीनालीकमूलादधिकपरिमलोन्मोहितानामलीनां
माला नीलेव यान्ती स्फुरति रुचिमती वक्त्रपद्मोन्मुखी या ।
रम्या सा रोमराजिर्महितरुचिकरी मध्यभागस्य विष्णो:
चित्तस्था मा विरंसीच्चिरतरमुचितां साधयन्ती श्रियं नः ॥२६॥
भगवान श्रीहरीच्या या अद्वितीय उदराचे सौंदर्य पाहत असताना आचार्य श्रींची दृष्टी अधिकच सूक्ष्म होत जाते. त्यावेळी त्या उदरावर असणारी कोमल रोमावली त्यांच्या नजरेत भरते.
नाभीपासून सुरू होत वरच्या दिशेने गेलेल्या त्या रोमावलीचे म्हणजे केसांच्या रांगेचे वर्णन या श्लोकात आचार्य श्री करीत आहेत.
त्या रोमावलीचा ऊर्ध्वगामी अर्थात वर जात असण्याचे आचार्य श्रींनी दिलेले कारण देखील अत्यंत मनोहारी आहे.
आचार्य श्री म्हणतात,
नाभीनालीकमूलादधिकपरिमलोन्मोहितानामलीनां – भगवंताच्या नाभिकमलातून निघून वरच्या दिशेला जाणारी ही रोमावली म्हणजे जणूकाही भुंग्यांची रांग आहे. ती त्या नाभी कमलावर आकर्षित झाली होती.
माला नीलेव यान्ती स्फुरति रुचिमती वक्त्रपद्मोन्मुखी या – मात्र आता त्यापेक्षाही अधिक सुगंध देणाऱ्या मुख कमला च्या दिशेने ती वरच्या दिशेने जात आहे.
नाभिकमळातून वर जात असलेली रोमावली ही जणू भुंग्यांची रांग आहे आणि ती मुखकमलाच्या दिशेने वर जात आहे, या दोन्ही कल्पना एखाद्या महाकाव्यात शोभून दिसतील इतक्या रमणीय आहेत.
रम्या सा रोमराजिर्महितरुचिकरी मध्यभागस्य विष्णो: – भगवान श्रीविष्णूच्या मध्य भागात असणारी सगळ्यांना श्रेष्ठ गोष्टी प्रदान करणारी ती रम्य अशी रोमावली,
चित्तस्था मा विरंसीच्चिरतरमुचितां साधयन्ती श्रियं नः – माझ्या चित्तात सदैव विलसत असो. ती सदैव व माझे सर्व उचित कल्याण साधत असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply