कान्तं वक्षो नितान्तं विदधदिव गलं कालिमा कालशत्रो:
इन्दोर्बिंम्बं यथाङ्को मधुप इव तरोर्मंजरीं राजते यः ।
श्रीमान्नित्यंविधेयादविरलमिलितः कौस्तुभश्रीप्रतानैः
श्रीवत्सः श्रीपतेः स श्रिय इव दयितो वत्स उच्चैः श्रियं नः ॥२९॥
या श्लोकात भगवान विष्णूंच्या छातीवर असणाऱ्या श्री व चिन्हाचे वर्णन आचार्य श्री करीत आहेत. यामागे एक पौराणिक कथा आहे. भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यामध्ये श्रेष्ठ कोण? याची परीक्षा पाहण्याचे काम सर्व ऋषींनी महर्षी भृगूंना सोपवले. महर्षींनी तिघांचाही अपमान केला. या अपमानाने दोघे संतापले. मात्र श्रीविष्णू शांतच होते. त्यांना आणखीन चिडवण्यासाठी भृगूंनी त्यांच्या छातीवर लाथ मारली. मात्र तरीही शांत असणाऱ्या भगवंतांनी ते ऋषीचे चरणकमल आपल्या छातीवर कायमचे धारण केले. भगवंताच्या अत्यंत शांत आणि क्षमाशील वृत्तीचे प्रतीक असणाऱ्या या चिन्हाला श्रीवत्स असे म्हणतात.
वास्तविक तो पायाचा डाग आहे पण तो सुद्धा किती सुंदर दिसतो हे सांगण्यासाठी अन्य उदाहरणे देत आचार्य श्री म्हणतात,
कान्तं वक्षो नितान्तं – त्या श्रीवत्सा ने भगवंताचे वक्षस्थळ अत्यंत सुंदर दिसत आहे.
विदधदिव गलं कालिमा कालशत्रो: – जसे हालाहल पिण्यामुळे काळाचा शत्रू असणाऱ्या महाकाल भगवान शंकरांचा काळा सुंदर दिसतो.
इन्दोर्बिंम्बं यथाङ्को – जसा चंद्रावर डाग असला तरी तो शोभून दिसतो.
मधुप इव तरोर्मंजरीं राजते यः – वर काळा बेढब भुंगा बसला तरी झाडाचा फुलोरा सुंदर दिसतो.
श्रीमान्नित्यंविधेयादविरलमिलितः कौस्तुभश्रीप्रतानैः – भगवंताच्या छातीवर नित्य विराजित, कौस्तुभमण्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले,
श्रीवत्सः श्रीपतेः स श्रिय इव दयितो वत्स उच्चैः श्रियं नः – भगवान श्री पतीच्या छातीवरील श्रीवत्स जणू त्यांची संपत्ती आहे. श्रीवत्स आम्हाला श्रेष्ठ कल्याण प्रदान करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply