अव्यान्निर्घातघोरो हरिभुजपवनामर्शनाध्मातमूर्तेः
अस्मान्विस्मेरनेत्रत्रिदशनुतिवचःसाधुकारैः सुतारः ।
सर्वं संहर्तुमिच्छोररिकुलभुवनं स्फारविस्फार नादः
संयत्कल्पान्तसिन्धौ शरसलिलघटावार्मुचः कार्मुकस्य ॥३॥
भगवान वैकुंठनाथांच्या हातातील शंख आणि चक्राचे वर्णन केल्यानंतर त्यांच्या आणखी एका दिव्य अस्त्राची वंदना करताना आचार्य श्री भगवान श्रीविष्णूंच्या शार्ङ् नामक धनुष्याचे वर्णन करीत आहेत.
शृंग म्हणजे शिंगापासून निर्माण केलेले असल्याने या धनुष्याला शार्ङ् असे म्हणतात. याच शब्दाचे अपभ्रंश होत पुढे शारंगधर, सारंगपाणि असे शब्द रूढ झाले.
या धनुष्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
अव्यान्निर्घातघोरो हरिभुजपवनामर्शनाध्मातमूर्तेः – वार्याच्या वेगाने हलणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या हातात असणाऱ्या, सर्व प्रकारच्या भीषण संकटांचा विनाश करणाऱ्या,
अस्मान्विस्मेरनेत्रत्रिदशनुतिवचःसाधुकारैः सुतारः – आमचे संकट दूर करणाऱ्या अशा त्याच्या स्वरूपामुळे अर्थात सर्व देवांनी केलेल्या स्तुतीचे साधू उद्गार, दिलेल्या धन्यवादाच्या आरोळ्यांनी ज्याचा सुतार म्हणजे टणत्कार अधिकच गगनभेदी होत आहे.
सर्वं संहर्तुमिच्छोररिकुलभुवनं – दैत्यांच्या संपूर्ण कुळाचाच परिपूर्ण विनाश करण्याची इच्छा असलेल्या,
स्फारविस्फार नादः – त्याच्या टणत्काराच्या नादाने,
संयत्कल्पान्तसिन्धौ – जणूकाही प्रलय ओढवलेला आहे असा भास निर्माण करणारे. शरसलिलघटावार्मुचः – बाणांचा जणुकाही ढग फुटावा असा वर्षाव करणाऱ्या,
कार्मुकस्य – भगवान श्रीहरीच्या धनुष्याचे, वर्णन नेमके करावे तरी कसे?
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply