संभूयांभोधिमध्यात्सपदि सहजया यः श्रिया संनिधत्ते
नीले नारायणोरस्थल गगनतले हारतारोपसेव्ये
आशाः सर्वाः प्रकाशा विदधदपिदधच्चात्मभासान्यतेजां-
स्याश्चर्यस्याकरो नो द्युमणिरिव मणिः कौस्तुभः सोऽस्तु भूत्यै ॥३०॥
यानंतर आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या वक्षस्थळा वर विराजमान असणाऱ्या कौस्तुभ रत्नाचे वर्णन करीत आहेत.
ते म्हणतात,
संभूयांभोधिमध्यात्सपदि सहजया यः श्रिया संनिधत्ते – जे समुद्रमंथनाच्या मधून निर्माण झाले. जे सहजपणे सर्व वैभवाला एकत्रित धारण करते.
या ओळीत आचार्यांनी त्याच्या दोन महत्त्वाच्या गोष्टींचे वर्णन केले आहे. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून जी चौदा रत्ने निर्माण झाली यापैकी एक महत्त्वाचे रत्न म्हणजे कौस्तुभ.
ते सहजपणे सर्व वैभव एकत्र करते याचा अर्थ संपूर्ण विश्वातील सर्व वैभव एका बाजूला आणि भगवंताच्या गळ्यातील हे कौस्तुभ रत्न एकाबाजूला. तरीही तेच अधिक मौल्यवान ठरेल. असे त्याचे वैभव आचार्यश्री वर्णन करतात.
नीले नारायणोरस्थल गगनतले हारतारोपसेव्ये – भगवंताच्या नीलवर्णीय वक्षस्थळ रुपी गगना मध्ये असणाऱ्या मोत्यांच्या माळा मधील मोती रूपी तारकांच्या मधी चंद्राप्रमाणे शोभणारे,
आशाः सर्वाः प्रकाशा विदधदपिदधच्चात्मभासान्यतेजां- सर्व प्रकारच्या प्रकाशांची आपण अधिक तेजस्वी ही आशा मावळून टाकणाऱ्या, त्यांचे तेज हरण करणाऱ्या त्या कौस्तुभ मण्याकडे
स्याश्चर्यस्याकरो नो द्युमणिरिव मणिः – सूर्याप्रमाणे चमकदार असल्यामुळे आश्चर्याला कारणीभूत असणाऱ्या त्याकडे पाहणाऱ्या, आमच्या सगळ्यांच्या साठी,
कौस्तुभः सोऽस्तु भूत्यै – ते कौस्तुभ रत्न कल्याणाचे कारण ठरो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply