या वायावानुकूल्यात्सरति मणिरुचा भासमानासमाना
साकं साकंपमंसे वसति विदधते वासुभद्रं सुभद्रं ।
सारं सारंगसंघैर्मुखरित कुसुमा मेचकांता च कांता
माला मालालितास्मान्न विरमतु सुखैः योजयन्ती जयन्ती ॥३१॥
भगवान श्रीविष्णुच्या वक्षस्थळावरील श्रीवत्स चिन्हाचे आणि कौस्तुभ मण्याचे सौंदर्य वर्णन केल्यानंतर आचार्य श्रींची दृष्टी तेथे असणाऱ्या अत्यंतिक वैभवसंपन्न अशा वैजयंती माले कडे जाते. त्या अम्लान अर्थात कधीही न कोमेजनाऱ्या माळेचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
या वायावानुकूल्यात्सरति – भगवान श्रीविष्णु ज्या क्षीरसागरात शांतपणे पहुडले आहेत तेथे वाहणार्या वार्याने ती माळ सळसळत असते.
मणिरुचा भासमाना – कौस्तुभ मण्याच्या तेजा प्रमाणेच चकचकित असणारी.
असमाना – जिच्या समान जगात दुसरी कोणतीही माला नाही अशी. अनुपमेय. अतुलनीय.
साकं साकंपमंसे वसति विदधते वासुभद्रं सुभद्रं – अत्यंत सुंदर असणारी ती मला आपल्या प्रत्येक हालचालीने भगवान श्री विष्णूंना आनंद प्रदान करते.
सारं सारंगसंघैर्मुखरित – तिच्यावर रुळणाऱ्या भुंग्यांनी केलेल्या गुंजारवाला मुळे जणूकाही तीच आवाज करत आहे असे वाटणारी.
कुसुमा मेचकांता च कांता – निळ्या कमळाच्या फुलानी निर्माण केली असल्यामुळे नीलकांतीने शोभून दिसणारी. अतीव रमणीय असणारी.
माला मालालितास्मान्न विरमतु सुखैः योजयन्ती जयन्ती – ती वैजयंतीमाला आम्हाला अखंड सुखाची माला अर्थात रांग प्रदान करो. माला शब्दाचे दोन अर्थ आचार्यांनी येथे मोठ्या खुबीने योजले आहेत. पुष्पांची समूह रचना असा गळ्यातील माळे करता शब्द वापरला तर सुखांच्या अनवरत प्राप्तीसाठी सुख माला शब्द वापरला.
भगवंताच्या गळ्यातील ती वैजयंतीमाला आम्हाला देखील विजय प्रदान करो. ती गळ्यात असलेल्याचा कधीच पराजय होत नाही, विजयच विजय असतो या अर्थानेच तिला वैजयंती असे म्हटले आहे
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply