कण्ठाकल्पोद्गतैर्यः कनकमयलसत् कुण्डलोस्रैरुदारै-
रुद्योतैः कौस्तुभस्याप्युरुभिरुपचितः चित्रवर्णो विभाति ।
कण्ठाश्लेषे रमायाः करवलयपदैः मुद्रिते भद्ररूपे
वैकुण्ठीयेऽत्र कण्ठे वसतु मम मतिः कुण्ठभावं विहाय ॥३४॥
भगवान श्रीविष्णूंच्या विशाल बाहूंचे, स्कंधांचे वर्णन केल्यानंतर आता पूज्यपाद आचार्य श्री भगवंताच्या दिव्य कंठाचे वर्णन करीत आहेत.
त्या गळ्यामध्ये असणाऱ्या विविध रत्नमालिकांच्या प्रभेने उजळून निघालेल्या त्या कंठ प्रदेशाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
कण्ठाकल्पोद्गतैर्यः कनकमयलसत् कुण्डलोस्रैरुदारै-
रुद्योतैः – या भगवंताच्या गळ्यामध्ये धारण केलेल्या विविध रत्नांच्या प्रभा तेथे पसरलेल्या आहेत. त्यातच कानात धारण केलेल्या सुवर्ण निर्मित मकर कुंडलांना जडावलेल्या अनमोल रत्नांची प्रभा मिसळलेली आहे.
त्या दोन्हींचा एकत्रीकरणाने तो कंठ प्रदेशात अधिकच उजळलेला आहे. कौस्तुभस्याप्युरुभिरुपचितः चित्रवर्णो विभाति – त्यामध्ये गळ्यात धारण केलेल्या कौस्तुभमण्यामधून बाहेर पडणाऱ्या विविधरंगी प्रकाश परिवर्तनाने तो कंठ विविध रंगांनी शोभून दिसत आहे.
कण्ठाश्लेषे रमायाः करवलयपदैः मुद्रिते भद्ररूपे – देवी रमा अर्थात भगवती लक्ष्मीने या कंठाला घट्ट आलिंगन दिले आहे. त्यावेळी तिच्या हातामध्ये असणाऱ्या कंकणांनी निर्माण झालेल्या सुंदर वळ्या त्या कंठा ची शोभा वृद्धिंगत करीत आहेत.
आईच्या हातातील कड्यांचा दाब पडून निर्माण झालेल्या या आकृत्या जणू त्यांच्या उत्कट प्रेमाचे प्रतीक आहेत.
वैकुण्ठीयेऽत्र कण्ठे वसतु मम मतिः कुण्ठभावं विहाय – जेथे सर्व गोष्टी कुंठित होतात अर्थात जेथे वर्णनाचे शब्द कमी पडतात अशाच या कंठाच्या ठिकाणी स्वतःचा कुंठीत भाव सोडून म्हणजे मुक्तपणे माझी बुद्धी निवास करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply