पद्मानन्दप्रदाता परिलसदरुणश्रीपरीताग्रभागः
काले काले च कम्बुप्रवर शशधरापूरणे यः प्रवीणः ।
वक्त्राकाशान्तरस्थस्तिरयति नितरां दन्ततारौघशोभाम्
श्रीभर्तुर्दन्तवासोद्युमणिरघतमोनाशनायास्त्वसौ नः ॥३५॥
भगवंतांच्या कंठाच्या लोकविलक्षण सौंदर्याचे वर्णन केल्यानंतर अधिक उन्नत झालेली आचार्य श्रींची प्रतिभा भगवंताच्या अधरोष्ठावर म्हणजे खालच्या ओठावर खिळते. त्या अतिदिव्य रसपूर्ण ओठाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
पद्मानन्दप्रदाता – कमळामध्ये निवास करणाऱ्या देवी पद्मा अर्थात महालक्ष्मीला अद्वितीय आनंद प्रदान करणारा, परिलसदरुणश्रीपरीताग्रभागः – अरुणोदयकाली आसमंतात फाकलेल्या दिव्य लाल रंगाने शोभणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये पुढे असलेला. अर्थात सर्व लाल रंगाच्या वस्तूंमध्ये सर्वश्रेष्ठ लाल रंग धारण करणारा,
काले काले च कम्बुप्रवर शशधरापूरणे यः प्रवीणः – विविध समयी वाजवण्यासाठी जवळ धरल्यामुळे चंद्राप्रमाणे पांढऱ्याशुभ्र असणाऱ्या पांचजन्य शंखाला पूर्णत्व प्रदान करणारा. शंखा आवाज निघाला तरच शंख पूर्ण उपयोगाचा झाला असा भाव आहे.
वक्त्राकाशान्तरस्थस्तिरयति नितरां दन्ततारौघशोभाम् – मुखाच्या आत असणाऱ्या दंत रुपी नक्षत्रांच्या तेजाला झाकाळून टाकणाऱ्या सूर्याप्रमाणे असणाऱ्या.
श्रीभर्तुर्दन्तवासोद्युमणिरघतमोनाशनायास्त्वसौ न: – ज्यामध्ये आकाशातील नक्षत्रा प्रमाणे असणारे भगवंताचे दात निवास करतात तो सकल अंधकाराचा विनाश करणारा भगवंताचा अधरोष्ठ आमच्या पापाचे निवारण करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply