नित्यं स्नेहातिरेकान्निजकमितुरलं विप्रयोगाक्षमा या
वक्त्रेन्दोरन्दराले कृतवसतिरिवाभाति नक्षत्रराजिः ।
लक्ष्मीकान्तस्य कान्ताकृतिरतिविलसन्मुग्धमुक्ताफलश्री:
दन्ताली संततं सा नतिनुतिनिरतान् रक्षतादक्षता नः ॥३६॥
भगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
नित्यं स्नेहातिरेकान्निजकमितुरलं विप्रयोगाक्षमा या – त्या दंतपंक्ती चे भगवान विष्णूंवर आत्यंतिक प्रेम असल्याने, आपल्या प्रेमाचा आधार असलेल्या भगवंताला त्या कधीही सोडून जात नाहीत.
येथे दात सोडून जाणे म्हणजे दात पडणे. दात पडणे हे म्हातारपणाचे लक्षण आहे. भगवंत चिरतरुणच असल्याने वृद्धत्व इ. विकार यांच्या ठिकाणी संभवत नसल्याने त्यांचे दात पडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्या दातांची शाश्वतता वर्णन करीत आचार्य श्री भगवंताच्या या नित्य तारुण्याचा विचार मांडत आहेत.
वक्त्रेन्दोरन्दराले कृतवसतिरिवाभाति नक्षत्रराजिः – भगवंताच्या मुख रुपी चंद्राच्या सोबत नक्षत्र रुपी तारकां प्रमाणे लखलखत असणारी,
लक्ष्मीकान्तस्य – भगवान श्री विष्णूंची, कान्ताकृतिरतिविलसन्मुग्धमुक्ताफलश्री: – देवी लक्ष्मीची रती म्हणजे प्रेम रुपी चुंबन कृतीने ज्यांचे तेज अधिकच प्रदीप झाले आहे अशी, मोत्याप्रमाणे चमकणारी,
दन्ताली संततं सा नतिनुतिनिरतान् रक्षतादक्षता नः – ती दंतपंक्ती भगवंताच्या चरणी नमस्कार करणाऱ्या आम्हा सगळ्यांच्या रक्षणामध्ये दक्ष असो. आमच्या सर्व दुःखांना नष्ट करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply