कर्णस्थस्वर्णकम्रोज्ज्वलमकरमहाकुण्डलप्रोतदीप्य-
न्माणिक्यश्रीप्रतानैः परिमिलितमलिश्यामलं कोमलं यत् ।
प्रोद्यत्सूर्यांशुराजन्मरकतमुकुराकारचोरं मुरारेः
गाढामागामिनीं नो गमयतु विपदं गण्डयोर्मण्डलं तत् ॥३८॥
प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्री विष्णूंचा कपोल प्रदेशाचे अर्थात गालाच्यावर असणाऱ्या उंचवट्याचे वर्णन करीत आहेत.
त्यांच्या अद्वितीय तेजस्वीतेचा विचार करताना आचार्य श्री म्हणतात,
कर्णस्थस्वर्णकम्रोज्ज्वलमकरमहाकुण्डलप्रोतदीप्य- भगवान श्रीविष्णूंनी आपल्या कानात धारण केलेल्या अत्यंत सुंदर आणि तेजस्वी असणाऱ्या सुवर्णमय मकर कुंडल मधून बाहेर पडणाऱ्या रत्नांच्या प्रभेने भगवंताचे कपोलप्रदेश उजळून निघालेले आहेत.
न्माणिक्यश्रीप्रतानैः परिमिलितमलिश्यामलं कोमलं यत् – अली म्हणजे भुंगा. त्याच्याप्रमाणे निळसर काळे असणारे ते अत्यंत कोमल कपोल प्रदेश कुंडलातील माणिकांच्या प्रभेने तथा भगवंताच्या अत्यंत निरोगी प्रकृतीमुळे असणाऱ्या लालिमेने अधीकच आकर्षक दिसत आहेत.
प्रोद्यत्सूर्यांशुराजन्मरकतमुकुराकारचोरं मुरारेः – प्रात:काळच्या लालबुंद अरुण प्रकाशाने उजळून निघालेल्या एखाद्या पाचू किंवा नीलम प्रमाणे गडद रंगाचे
पाचू किंवा नीलम रत्न अत्यंत गडद रंगाचे असते. त्यावर समजा सकाळचा अरुणोदय काळचा लालबुंद प्रकाश पसरला तर ते जसे दिसेल तसे भगवंताचे गाल दिसत आहेत ही कल्पना किती नयनमनोहर आहे?
भगवान श्री विष्णूंचे,
गाढामागामिनीं नो गमयतु विपदं गण्डयोर्मण्डलं तत् – मजबूत प्रकृती असणाऱ्यांचे शरीर अवयव अत्यंत घट्ट असतात. तशा स्वरूपाचे असणारे भगवंताचे ते कपोल प्रदेश आमच्या सर्व विपत्तींचे निराकरण करणारे ठरोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply