दिक्कालौ वेदयन्तौ जगति मुहुरिमौ संचरन्तौ रवीन्दू
त्रैलोक्यालोकदीपावभिदधति ययोरेव रूपं मुनीन्द्राः ।
अस्मानब्जप्रभे ते प्रचुरतरकृपानिर्भरं प्रेक्षमाणे
पातामाताम्रशुक्लासितरुचिरुचिरे पद्मनेत्रस्य नेत्रे ॥४०॥
प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीहरीच्या अद्वितीय नेत्रकमलांचे वर्णन करीत आहेत.ते म्हणतात,
दिक्कालौ वेदयन्तौ जगति मुहुरिमौ संचरन्तौ रवीन्दू – वारंवार आकाश मंडलामध्ये उदय तथा अस्त रूपात फिरत असणारे, जगाला दिशा आणि काळाचे मार्गदर्शन करणारे , सूर्य आणि चंद्र,
त्रैलोक्यालोकदीपावभिदधति ययोरेव रूपं मुनीन्द्राः – जगताला प्रकाश दाखवत असल्यामुळे अशा स्वरूपात प्रकाशित असणाऱ्या त्या भगवंताच्या नेत्रा प्रमाणे आहेत.
अस्मानब्जप्रभे ते प्रचुरतरकृपानिर्भरं प्रेक्षमाणे – कमळाप्रमाणे अत्यंत प्रभा युक्त अर्थात तेजस्वी आणि आनंद देणारे असे ते अपार कृपेने भरलेल्या दृष्टीने आम्हाला पाहणारे,
पातामाताम्रशुक्लासितरुचिरुचिरे पद्मनेत्रस्य नेत्रे – लाल, पांढरे, काळ्या रंगाने अत्यंत आकर्षक दिसणारे नेत्र कमल आमचे रक्षण करोत.
भगवंताच्या नेत्रा मध्ये असणाऱ्या तीन रंगांचा विचार येथे आचार्यांनी केला आहे. त्यामध्ये भगवंताच्या नेत्रातील बाकीची बाजू पांढरीशुभ्र आहे. मध्यभागी असणारी बुबुळे काळी कुळकुळीत आहेत या दोन गोष्टी तर सहज लक्षात येतात. लाल रंगाचा संबंध काय? तर जी व्यक्ती अत्यंत आरोग्यसंपन्न असते तिच्या डोळ्यांच्या कडा लाल रंगाच्या असतात. भगवंताच्या त्या कडांचा लाल रंग येथे आचार्यांना अपेक्षित आहे.
अशा तीन रंगांनी जणू काही त्रिगुण स्वरूपात सर्वत्र पाहणारे भगवंताचे ते नेत्र आमचे कल्याण करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply