लक्ष्माकारालकालिस्फुरदलिकशशांकार्धसंदर्शमील-
न्नेत्रांभोजप्रबोधोत्सुकनिभृततरालीनभृंगच्छदाभे ।
लक्ष्मीकान्तस्य लक्ष्यीकृतविबुधजनापांगबाणासनार्ध-
च्छाये नो भूतिभूरिप्रसवकुशलते भ्रूलते पालयेताम् ॥४१॥
या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,
लक्ष्माकारालकालिस्फुरदलिकशशांकार्धसंदर्शमील- चंद्राच्या परिपूर्ण बिंबावर असणाऱ्या डागाप्रमाणे शोभून दिसणारी कुरळ्या केसांची एक बट भगवंताच्या चंद्र रुपी मस्तकावर रुळत आहे.
येथे आचार्यश्री एक अत्यंत अभिनव कल्पना आपल्यासमोर ठेवत आहेत. भगवंताच्या मस्तकाला त्यांनी अत्यंत अल्हाददायक असणाऱ्या चंद्राची उपमा दिली आहे. त्यावर येणारी बट जणू त्यावरील डाग आहे. त्यापेक्षा पुढे वर्णन करताना ते म्हणतात या चंद्राला पाहिल्यानंतर भगवंताचे सूर्य विकासी कमळाप्रमाणे असणारे नेत्र जळून काही चंद्र उगवला असे मानून अर्धवट मिटतात. त्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांच्या वर असणाऱ्या या भुवया म्हणजे,
न्नेत्रांभोजप्रबोधोत्सुकनिभृततरालीनभृंगच्छदाभे – नेत्र रुपी कमळांच्या उगवण्याची वाट पहात त्याच्यावर गुंजारव करत घिरट्या घालणाऱ्या भ्रमरांची रांग आहे.
लक्ष्मीकान्तस्य लक्ष्यीकृतविबुधजनापांगबाणासनार्ध- भगवान लक्ष्मीकांत श्री विष्णूंच्या या बाणासन अर्थात धनुष्याप्रमाणे असणाऱ्या,
च्छाये नो भूतिभूरिप्रसवकुशलते भ्रूलते पालयेताम् – विपुल मंगला ची निर्मिती करणाऱ्या, कौशल्यपूर्ण भ्रूलता आम्हाला सावली देख आमचे पालन करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply