पातात्पातालपातात्पतगपतिगतेर्भ्रूयुगं भुग्नमध्यं
येनेषच्चालितेन स्वपदनियमिताः सासुराः देवसंघाः ।
नृत्यल्लालाटरंगे रजनिकरतनोरर्धखण्डावदाते
कालव्यालद्वयं वा विलसति समया बालिकामातरं नः ॥४२॥
भगवान श्रीविष्णूंच्या भुवयांचे वर्णन करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
पातात्पातालपातात्पतगपतिगते र्भ्रूयुगं भुग्नमध्यं – पतगपती अर्थात पक्षांचा राजा असणाऱ्या गरुडाच्या भीतीने पाताळात जाऊन लपलेल्या महासर्पां प्रमाणे असणाऱ्या, दोन्ही भूभागाच्या मध्यभागी विद्यमान असणाऱ्या,
भगवंताच्या भुवया काळ्याशार असल्याने त्यांना सर्पाची उपमा दिली आहे. कपाळावरून या भुवया कानाच्या दिशेने जात आहेत. कान म्हणजे जणूकाही पाताल विवर आणि त्या कडे जाणाऱ्या भुवया जणूकाही महा सर्प ही आचार्य श्रींची अद्वितीय प्रतिभा शैली आहे.
येनेषच्चालितेन स्वपदनियमिताः सासुराः देवसंघाः – ज्यांच्या संचालनाने भगवान श्रीविष्णु राक्षसांच्या आणि देवांच्या समूहाचे संचालन करतात.
अर्थात त्यांनी केवळ भुवई हलवली तरी या दोघांनाही आपापली कामे मुकाट्याने करावी लागतात. भगवान यांचे संचालन करतात ते या अर्थाने.
नृत्यल्लालाटरंगे – ललाट रुपी रंगमंचावर नृत्य करणाऱ्या एखाद्या अद्वितिय नर्तिके प्रमाणे असणाऱ्या, रजनिकरतनोरर्धखण्डावदाते – भगवान चंद्राच्या कोरीप्रमाणे अत्यंत रेखीव असणाऱ्या,
कालव्यालद्वयं वा विलसति समया बालिकामातरं नः – दोन अत्यंत विशाल सर्पां प्रमाणे विलास करीत असणाऱ्या या बालिके प्रमाणे अल्लड आणि त्याच वेळी मातेप्रमाणे आदरणीय असणाऱ्या दोन भुवया आमचे संरक्षण करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply