रूक्षस्फारेक्षुचापच्युतशरनिकरक्षीणलक्ष्ये कटाक्ष-
प्रोत्फुल्लत्पद्ममाला विलसित महित स्फाटिकैशान लिङ्गम् ।
भूयाद्भूयो विभूत्यै मम भुवनपतेः भ्रूलताद्वन्द्वमध्या-
दुत्थं तत्पुण्ड्रमूर्ध्वं जनिमरणतमः खण्डनं मण्डनं च ॥४३॥
भगवान श्रीहरींच्या सुन्दरतम अशा प्रकारच्या भुवयांचे वर्णन केल्यानंतर बाबा विकत आचार्य श्रींची दृष्टी त्या भुवयांच्या वर असणाऱ्या अत्यंत सुंदर अशा तिलकाकडे जाते. त्या ऊर्ध्वपुंड्र अर्थात उभ्या स्वरूपात लावलेल्या टिळ्याचे आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
रूक्षस्फारेक्षुचापच्युतशरनिकरक्षीणलक्ष्ये कटाक्ष-
अत्यंत निर्दयपणे समोरच्याला संपवणाऱ्या मदनाच्या उसाच्या धनुष्याद्वारे देवी लक्ष्मी ने सोडलेले नेत्र कटाक्ष जेथे येऊन शांत होतात.
ही आचार्य श्रींची कल्पना अत्यंत रमणीय आहे. तो टिळा चंदनाचा आहे. त्यामुळे अत्यंत शीतल आहे. जगातील सगळ्यात मोठा ताप म्हणजे मदनाची पीडा. त्यातही देवी लक्ष्मी समान अनुपमेय सौंदर्यवती च्या माध्यमातून आलेली ही पीडा देखील शांत करणारा तो चंदन तिलक आहे.
प्रोत्फुल्लत्पद्ममाला विलसित महित स्फाटिकैशान लिङ्गम् ।
कमळाची माला धारण केलेल्या भगवान शंकरांच्या स्फटिक लिंगा प्रमाणे असणारा.
यामध्ये त्याच्या आकाराचा विचार आहे. त्याच प्रमाणे त्या चंदनाच्या टिळ्यावर लावलेला कुंकुमतिलक म्हणजे जणू काही पांढऱ्या शुभ्र भगवान शंकरावर वाहिलेले रक्त कमल असावे तसेच सौंदर्य दिसत आहे असे आचार्य म्हणतात.
भूयाद्भूयो विभूत्यै मम भुवनपतेः भ्रूलताद्वन्द्वमध्या- भगवान श्री विष्णू च्या दोन भुवयां रूपी लतांच्या मध्यभागी विलसत असणारा तो तिलक आमच्या विविध कल्याणाचे कारण ठरो.
दुत्थं तत्पुण्ड्रमूर्ध्वं जनिमरणतमः खण्डनं मण्डनं च – वरच्या दिशेला उठलेला तो पुंड्र म्हणजे तिलक आमच्या जन्ममरणाचे खंडन करणारा ठरो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply