पीठीभूतालकान्ते कृतमुकुटमहादेवलिङ्गप्रतिष्ठे
लालाटे नाट्यरंगे विकटतरतटॆ कैटभारेश्चिराय ।
प्रोद्घाट्यैवात्मतन्द्रीप्रकटपटकुटीं प्रस्फुरन्तीं स्फुटांगम्
पट्वीयं भावनाख्यां चटुलमतिनटी नाटिकां नाटयेन्न: ॥४४॥
भगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत.
त्या कपाळासोबत त्याच्यावर असणाऱ्या मुकुटाचा आरंभ तिथूनच होत असल्याने या मुकुटाचे लोकविलक्षण वर्णन आचार्य यांनी येथे केले आहे.
ते म्हणतात,
पीठीभूतालकान्ते कृतमुकुटमहादेवलिङ्गप्रतिष्ठे – भगवान श्रीविष्णूच्या कुरळ्या अशा केसावर अधिष्ठित असणारा मस्तकावरील मुकुट भगवान श्री महादेवांच्या लिंगाप्रमाणे दिसत आहे.
येथे आचार्यांनी प्रतिपादित केलेली हरिहर ऐक्य अत्यंत विलोभनीय आहे.
आपल्याला प्राधान्याने आठवल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्री विष्णूंच्या मस्तकावर शिवलिंग असणे ही कल्पनाच दोघांच्या ऐक्याला विशेषत्वाने प्रगट करणारी आहे.
लालाटे नाट्यरंगे विकटतरतटॆ कैटभारेश्चिराय – अशा त्या कैटभ राक्षसाला मारणाऱ्या भगवान श्री हरीचा अत्यंत सुंदर अशा पद्धतीचा ललाट प्रदेश जणूकाही एखाद्या रंगमंचाप्रमाणे आकर्षक दिसत आहे.
प्रोद्घाट्यैवात्मतन्द्रीप्रकटपटकुटीं प्रस्फुरन्तीं स्फुटांगम्
पट्वीयं भावनाख्यां चटुलमतिनटी नाटिकां नाटयेन्न: – त्या रंगमंचावर विविध प्रकारच्या कलागुणांना सादर करण्यात अत्यंत पटू असणारी आमची बुद्धी एखाद्या कुशल नटीप्रमाणे नृत्याचे विविध अंग सादर करीत मोक्षाचे नृत्य करो.
अर्थात जशी एखादी नर्तकी कायम रंगमंचावरच विलास करते त्याप्रमाणे आमची बुद्धी कायम भगवंताच्या या भालप्रदेशावरच खिळलेली राहो. तेथेच तिला आनंद प्राप्त होवो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply