मालालीवालिधाम्नः कुवलयकलिता श्रीपतेः कुन्तलाली
कालिन्द्यारुह्य मूर्ध्नो गलति हरशिरः स्वर्धुनी स्पर्धया नु ।
राहुर्वा याति वक्त्रं सकलशशिकलाभ्रान्ति लोलान्तरात्मा
लोकैरालोच्यते या प्रदिशतु सकलैः साखिलंमंगलं नः ॥४५॥
या आणि या पुढच्या श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय अशा केशसंभाराचे वर्णन करीत आहेत.
त्यासाठी त्यांनी योजलेल्या उपमा एखाद्या महाकवींच्या प्रतिभेला लाजवतील अशा पद्धतीच्या अद्वितीय आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
मालालीवालिधाम्नः कुवलयकलिता श्रीपतेः कुन्तलाली – मेघाप्रमाणे कृष्ण वर्णन असणाऱ्या भगवान श्रीविष्णूंच्या या कुरळ्या केसांच्या बटा निळ्या कमळाप्रमाणे आकर्षक दिसत आहेत.
कालिन्द्यारुह्य मूर्ध्नो गलति हरशिरः स्वर्धुनी स्पर्धया नु – भगवान शंकरांच्या मस्तकावर असणाऱ्या गंगेशी जणू काही स्पर्धा करीत भगवान विष्णूच्या डोक्यावरून वाहणाऱ्या कालिंदी प्रमाणे हे केस दिसत आहेत.
आचार्यांची ही कल्पना अत्यंत लोकविलक्षण आहे. भगवान शंकरांनी स्वर्धुनी म्हणजे गंगेला आपल्या डोक्यावर धारण केले. त्यामुळे जणू काही कालिंदी म्हणजे यमुना नाराज झाली. ती जणू काही भगवान विष्णूंच्या मस्तकावर आरूढ झाली. तिच्या काळ्या पाण्याचा प्रवाह खाली यावा तसे ते केस दिसत आहेतकल्पना केवळ आणि केवळ आचार्यांनाच सुचू शकते.
राहुर्वा याति वक्त्रं सकलशशिकलाभ्रान्ति – किंवा भगवंतांच्या मुखरुपी चंद्राला ग्रहण लावण्यासाठी आलेल्या राहू प्रमाणे ती दिसते.
ही आणखीन एक अद्भुत उपमा.
भगवंताचे मुख जणू चंद्र आहे. फिरणार्या त्या केसांना आचार्य राहू रूपात पाहतात. लोलान्तरात्मा
लोकैरालोच्यते या प्रदिशतु सकलैः साखिलंमंगलं नः – सर्व जगाचे प्राण आनंदित करणारी अशी ती केशवाची केशमालिका आम्हाला अखिल मंगल प्रदान करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply