सुप्ताकाराः सुषुप्ते भगवति विबुधैरप्यदृष्टस्वरूपा
व्याप्तव्योमान्तरालास्तरलरुचिजलारंजिताः स्पष्टभासः ।
देहच्छायोद्गमाभा रिपुवपुरगुरुप्लोषरोषाग्निधूम्याः
केशाः केशिद्विषो नो विदधतु विपुलक्लेशपाशप्रणाशम् ॥४६॥
भगवान श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यपूर्ण केशसंभाराचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
सुप्ताकाराः सुषुप्ते भगवति विबुधैरप्यदृष्टस्वरूपा – ज्याप्रमाणे सुषुप्ति मध्ये मग्न असलेला जीवात्मा बाहेरून जाणवत नाही, मायेने आवृत्त झालेले ब्रह्म इतरांना जाणवत नाही त्याप्रमाणे भगवान झोपले असताना या केशसंभारामुळे ते देवतांना देखील दिसेनासे होतात. यामध्ये भगवान जणूकाही झाकाळले जातात.
व्याप्तव्योमान्तरालास्तरलरुचिजलारंजिताः स्पष्टभासः – त्या केसांवर धारण केलेल्या मुकुटा मध्ये लावलेल्या मण्यांची चमक पाहतांना जणूकाही विशाल आकाशात होत असलेली चांदण्यांची चमचम जाणवते. संपूर्ण काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लुकलुकणाऱ्या चांदण्यांच्याप्रमाणे जाणवणारी आचार्यांची प्रतिभा खरोखरच अद्वितीय आहे.
देहच्छायोद्गमाभा रिपुवपुरगुरुप्लोषरोषाग्निधूम्याः – संपूर्ण शत्रूच्या शरीररूपी ऊद-राळ यांना जाळून उठणाऱ्या धुराच्या रेषेप्रमाणे हे कुरळे केस भासतात.
आचार्य श्रींच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली आणखीही एक वेगळी उपमा. भगवंताची केस कुरळे आहेत. त्या कुरळ्या रेषा त्यांना धुरा प्रमाणे वाटतात. मात्र धूप लावल्यानंतर येणारा धूर पांढरा असतो. मात्र केस काळे आहेत. त्यासाठी आचार्य श्री हा धूप सामान्य नसून राक्षसांच्या विनाशातून उगवलेला आहे असे म्हणतात त्यात राक्षसांचा काळेपणा आहे अशी अद्वितीय भूमिका मांडत आहेत.
केशाः केशिद्विषो नो विदधतु विपुलक्लेशपाशप्रणाशम् – केशी राक्षसाला मारणाऱ्या भगवंताच्या केसां मुळे आमचे सर्व क्लेश रुपी पाश नष्ट होवोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply