मत्स्यः कूर्मो वराहो नरहरिणपतिः वामनो जामदग्न्यः
काकुत्स्थः कंसघाती मनसिजविजयी यश्च कल्की भविष्यन् ।
विष्णोरंशावतारा भुवनहितकरा धर्मसंस्थापनार्थाः
पायासुर्मां त एते गुरुतरकरुणाभारखिन्नाशया ये ॥४९॥
प्रस्तुत श्लोकांमध्ये आचार्य श्री भगवान श्रीहरी विश्व उद्धारासाठी धारण केलेल्या दशावतारांचे वर्णन करीत आहेत.
ते म्हणतात,
मत्स्यः – महाराज मनूंचे संरक्षण करून प्रलय काळात त्यांना वाचवणाऱ्या, त्यांच्याद्वारे नव सृष्टी ची निर्मिती करणाऱ्या मत्स्य स्वरूपात नटलेल्या,
कूर्मो – समुद्रमंथनाच्या वेळी मंदराचल बुडू लागल्यानंतर त्याला आधार देण्यासाठी कूर्म रूपाच साकारलेल्या,
वराहो – हिरण्याक्षाने पृथ्वी बुडवल्यानंतर तिला वाचवण्यासाठी वराह अर्थात ज्ञान रूपात प्रकटलेल्या,
नरहरिणपतिः – भक्तराज प्रल्हादाला सुख देण्यासाठी, हिरण्यकश्यपू चा वध करण्यासाठी नरसिंह रूपात प्रकटलेल्या,
वामनो – महाराज बलींच्या उद्धारासाठी वामन रूप धारण केलेल्या,
जामदग्न्यः – उन्मत्त राजसत्ता रुपी सहस्त्रार्जुनाचा वध करीत धर्म सत्तेची स्थापना करणाऱ्या जमदग्नी पुत्र परशुराम रूपात लीला करणाऱ्या,
काकुत्स्थः – ककुस्थ राजाच्या वंशात श्री रामचंद्र रुपात प्रगटल्यामुळे काकुस्थ हे नाव धारण करणाऱ्या,
कंसघाती – कंसादिकांच्या विनाशासाठी भगवान श्रीकृष्ण रूपात अवतीर्ण झालेल्या,
मनसिजविजयी – मनसिज अर्थात काम इ. सर्व विकारांना जिंकणाऱ्या जितेंद्रिय बुद्ध रूपात जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या,
यश्च कल्की भविष्यन् – भविष्यामध्ये कल्की रूपाय अवतीर्ण होणार्या
विष्णोरंशावतारा – भगवान विष्णूंचे जे विविध अवतार झाले,
भुवनहितकरा धर्मसंस्थापनार्थाः – ते धर्मसंस्थापना करणारे आणि विश्वाचे परम हित साधणारे, सर्व अवतार,
पायासुर्मां त एते गुरुतरकरुणाभारखिन्नाशया ये – अत्यंत श्रेष्ठ अशा करुणेने, खिन्नतेचे आशय असणाऱ्या माझे संरक्षण करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply