कम्राकारा मुरारेः करकमलतलेनानुरागाद्गृहीता
सम्यग्वृत्ता स्थिताग्रे सपदि न सहते दर्शनं या परेषां ।
राजन्ती दैत्यजीवासवमदमुदिता लोहितालेपनार्द्रा
कामं दीप्तांशुकान्ता प्रदिशतु दयितेवाऽस्य कौमोदकी नः ॥५॥
युद्धाच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी भगवान हातात तलवार किंवा धनुष्य धारण करतात. त्यामुळे त्याचे वर्णन वर केले आहे.
मात्र भगवंताच्या हातात सदैव असणारे आयुध म्हणजे गदा. या गदेचे नाव आहे कौमोदकी.
मोद म्हणजे आनंद. सगळ्या जगाला राक्षसांच्या त्रासापासून वाचवून आनंद देणारी असल्याने तिला कौमोदकी असे म्हणतात.
तिचे महात्म्य वर्णन करून वंदन करताना आचार्य श्री म्हणतात,
कम्राकारा – अत्यंत सुंदर आकार असलेली, आकर्षक स्वरूप असणारी,
मुरारेःकरकमलतलेनानुरागाद्गृहीता – मुर नावाच्या राक्षसाचा विनाश करणारऱ्या भगवान विष्णूंना मुरारी असे म्हणतात.
अशा भगवान श्रीविष्णूंनी आपल्या करकमलाच्या अग्रभागाने अर्थात बोटांनी, अत्यंत प्रेमाने धारण केलेली,
सम्यग्वृत्ता – सर्व बाजूंनी व्यवस्थित गोल असलेली. समान असणारी.
स्थिताग्रे सपदि न सहते दर्शनं या परेषां – जिला आपल्यासमोर उभ्या असलेल्या शत्रूचे दर्शनही सहन होत नाही. अर्थात शत्रू दिसताच ती त्याचा विनाश करते. कोणताही शत्रू तिच्यासमोर उभा ही राहू शकत नाही अशी.
राजन्ती दैत्यजीवासवमदमुदिता – त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्त आणि मदाला जिरवणारी,
लोहितालेपनार्द्रा – त्या रक्ताच्या लेपाने ओली दिसणारी.
कामं दीप्तांशुकान्ता प्रदिशतु दयितेवाऽस्य कौमोदकी नः – ती अत्यंत तेजस्वी कौमोदकी नावाची गदा आमच्या मनोकामना पूर्ण करणारी ठरो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply