यस्माद्वाचो निवृत्ताः सममपि मनसा लक्षणामीक्षमाणाः
स्वार्थालाभात्परार्थ व्यपगमकथनश्लाघिनो वेदवादाः ।
नित्यानन्दं स्वसंविन्निरवधिविमलस्वांतसंक्रान्तबिंब-
च्छायापत्यापि नित्यं सुखयति यमिनो यत्तदव्यान्महो नः ॥५०॥
अशा स्वरूपात भगवान श्रीविष्णूच्या अलौकिक स्वरूपाच्या सगुण-साकार रूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात त्यांच्या निर्गुण-निराकार स्वरूपास वंदन करीत आहेत. सगुण साकार रूप भक्तांच्या सुविधेसाठी भगवंताने धारण केली असले तरी त्यांचे मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे हेच आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.
ते म्हणतात,
यस्माद्वाचो निवृत्ताः सममपि मनसा लक्षणामीक्षमाणाः – ज्याच्यापाशी गेल्यानंतर वाणी निवृत्त होते. मनासह ती त्या स्वरूपाचे ठिकाणी एकरूप झाली की विलय पावते.
स्वार्थालाभात्परार्थ व्यपगमकथनश्लाघिनो वेदवादाः – ज्याचे कोणत्याही स्वरूपाच्या व्यावहारिक अस्तित्वाच्या रूपात वर्णन करणे शक्य नसल्याने वेदविद्या पारंगत नाइलाजाने त्याचे नेति नेति स्वरूपात वर्णन करतात.
अर्थात असे नाही, असे नाही असे म्हणतात सर्व वर्णनाच्या ते पलीकडे आहे,ते केवळ अनुभवता येते हेच सांगतात.
नित्यानन्दं स्वसंविन्निरवधिविमलस्वांतसंक्रान्तबिंब- अशा त्या नित्य आनंद स्वरूप असणाऱ्या, स्वतःच्याच शक्तीने स्वतःची जाणीव करून देणाऱ्या, अत्यंत शुद्ध असणाऱ्या, देहामध्ये जीव स्वरूपात ज्याचे प्रतिबिंब प्रगट होत असते अशा त्या मूळ चैतन्य बिंब स्वरूप असणाऱ्या,
च्छायापत्यापि नित्यं सुखयति यमिनो यत्तदव्यान्महो नः – जीव स्वरूपात प्रतिबिंबित झालेले चैतन्य आमचे संरक्षण करो.
या श्लोकात वर्णन करताना आरंभी आचार्यश्री केनोपनिषदातील ” यतो वाचो निवर्तन्ते… ” या मंत्राचा उल्लेख करीत आपल्या कथनाला असणारी श्रुती अधिष्ठानाची भूमिका स्पष्ट करीत आहेत. तर शेवटी “जीवो ब्रह्मैव नापर:!” हा सिद्धांत विशद करीत आहेत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply