आपादादा च शीर्षाद्वपुरिदमनघं वैष्णवं स्वचित्ते
धत्ते नित्यं निरस्ताखिलकलिकलुषे संततान्तः प्रमोदः ।
जुह्वज्जिह्वाकृशानौ हरिचरितहविः स्तोत्र मन्त्रानुपाठैः
तत्पादांभोरुहाभ्यां सततमपि नमस्कुर्महे निर्मलाभ्याम् ॥५१॥
भगवान श्रीहरीच्या दिव्यरूपाचे आणि निर्गुण निराकार स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आचार्य श्री या श्लोकात भगवंताच्या भक्तांना वंदन करीत आहेत. सोबतच अशा भक्तांची जीवनयात्रा कशी असते त्याचेही अद्वितीय निरूपण करीत आहेत.
आपादादा च शीर्षाद्वपुरिदमनघं वैष्णवं स्वचित्ते
धत्ते नित्यं निरस्ताखिलकलिकलुषे संततान्तः प्रमोदः – भगवान श्री विष्णू च्या अशा प्रकारच्या चरण कमला पासून शीर्षा पर्यंत असणाऱ्या अतिदिव्य स्वरूपाला जे वैष्णव अर्थात विष्णूचे उपासक मनामध्ये धारण करतात त्यांच्या अंतरंगी अखंड आनंद प्रवाहित राहतो त्यांना कोणत्याही प्रकारे कलीचा अर्थात कोणत्याही प्रकारच्या अवगुणांचा दोष स्पर्शही करीत नाही.
जुह्वज्जिह्वाकृशानौ हरिचरितहविः स्तोत्र मन्त्रानुपाठैः
असे हे भक्त आपल्या प्रारब्ध वशात चालत राहणाऱ्या जीवन यात्रेत, वाणी रूपी अग्नीमध्ये, हरी चरित्र रुपी आहूत्यांनी, स्तोत्र आणि मंत्र पाठाच्या गजरात हवन करीत राहतात.
त्यांचे संपूर्ण जीवन हाच यज्ञ असतो. त्यांच्या वाणीतून अखंड हरिनाम संकीर्तन प्रसवत असते. तेच आत भरलेले असते तेच बाहेर येते.
तत्पादांभोरुहाभ्यां सततमपि नमस्कुर्महे निर्मलाभ्याम् – अशा त्या निर्मल भक्तांच्या चरण कमलांवर आम्ही सदैव वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply