विष्णोर्विश्वेश्वरस्य प्रवरशयनकृत् सर्वलोकैकधर्ता
सोऽनन्तः सर्वभूतः पृथुविमलयशाः सर्ववेदैश्च वेद्यः ।
पाता विश्वस्य शश्वत् सकलसुररिपुध्वंसनः पापहन्ता
सर्वज्ञः सर्वसाक्षी सकलविषभयात् पातु भोगीश्वरो नः ॥७॥
भगवान श्रीविष्णूंच्या हातातील विविध आयुधांचे वर्णन केल्यानंतर प्रस्तुत श्लोकात भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज श्रीहरीच्या आसन स्वरूपात विराजमान असणाऱ्या भगवान श्री शेषांचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
विष्णोर्विश्वेश्वरस्य – सगळ्या विश्वाचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीविष्णूचे,
प्रवरशयनकृत् – लोकविलक्षण अशाप्रकारचे श्रेष्ठ शयन असणाऱ्या,
सर्वलोकैकधर्ता – सर्व जगताला धारण करणारे. ही सर्व चवदा भुवनांची उतरंड श्रीशेषांनी मस्तकावर धारण केली आहे अशी आपल्या शास्त्राची मान्यता आहे.
सोऽनन्तः – ते भगवान अनंत, शेषराज.
सर्वभूतः पृथुविमलयशाः – संपूर्ण जगात ज्यांचे विशाल आणि शुद्ध यश पसरलेले आहे . सर्ववेदैश्च वेद्यः – सर्व ज्ञानाचाही आधार असणारे. पतंजली स्वरूपात अवतार धारण करून ज्यांनी योग्य व्याकरण इत्यादी सगळ्यांचे ज्ञान जगात पसरवले.
पाता विश्वस्य शश्वत् – सर्व विश्वाचे कायम पालन करणारे. सकलसुररिपुध्वंसनः – देवतांच्या सगळ्या शत्रूचा विनाश करणारे. युद्धामध्ये कायम देवतांच्या बाजूने उभे असलेले. भगवंताच्या अवतारांमध्ये त्यांच्यासोबत असलेले.
पापहन्ता- सर्व पापाचा विनाश करणारे.
सर्वज्ञः – सर्व काही जाणणारे.
सर्वसाक्षी – स्वतः अनंत असल्याने सर्व अंत असणाऱ्या गोष्टींचा शेवट साक्षी रूपात पाहणारे.
सकलविषभयात् पातु भोगीश्वरो नः – पाताळ लोकांमध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या भोगांचे स्वामी असणारे ते भगवान श्री शेष आमचे सर्व प्रकारच्या विषांच्या भीतीपासून रक्षण करोत.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply