नवीन लेखन...

श्रीयमुनाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीयमुनाष्टकम् – मराठी अर्थासह

श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या या आठ श्लोकांच्या स्तोत्रात यमुनेच्या अथांग पात्राचे, यमुनेच्या आठ दैवी शक्तींचे वर्णन, तसेच कृष्ण-कृष्णप्रिया-कालिंदी यांच्या लीला हळुवारपणे उलगडल्या आहेत.

यमुना ही दिव्य सूर्याची कन्या,यमाची धाकटी व शनीची थोरली बहीण आहे. कालिंद पर्वतातून स्वर्गातून पृथ्वीवर येण्याचा तिचा उद्देश तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्याचा आहे. नदी म्हणून तिची अवस्थाही अतिशय आकर्षक आणि मोहक आहे. ती इतकी दयाळू आहे की, ती दुष्ट आत्मा असलेल्या लोकांनाही आशीर्वाद देते. भारतातील महत्त्वाच्या नद्यांपैकी फक्त यमुनेचे पूजन एखाद्या अन्य पूजेमध्ये होते. अन्य कोणत्याही नदीची पूजा इतर व्रतात किंवा मुख्य पूजेमध्ये समाविष्ट नाही. (गंगापूजन गंगा घरी आणल्यावर, तर नर्मदापूजन नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यावर घरी परत आल्यावर केले जाते). यमुनेची पूजा श्रीमद् अनंतपूजेत अंतर्भूत आहे. चैत्र शुद्ध षष्ठीला यमुना जयन्ती साजरी केली जाते. इतर अनेक देवतांच्या अष्टकांच्या अखेरीस ‘फलश्रुती’ असते, येथे ती नाही हे लक्षणीय आहे.

असे म्हणतात की गंगा नदी मोक्षदायिनी आहे, तर यमुना प्रेमाची अनुभूती देणारी आहे. कदाचित त्यामुळेच कृष्णलीलांमध्ये यमुनेच्या डोहातील कालियामर्दन महत्त्वाचे असले, तरी त्याचा येथे उल्लेखही नाही.

या स्तोत्राची रचना १६ अक्षरांच्या पंचचामर वृत्तात (जरजरजगा) केली आहे.


मुरारिकायकालिमाललामवारिधारिणी

तृणीकृतत्रिविष्टपा त्रिलोकशोकहारिणी ।

मनोऽनुकूलकूलकुञ्जपुञ्जधूतदुर्मदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥१॥

मराठी- जिच्या पाण्याचा रंग श्रीकृष्णाच्या काळसर शरीराप्रमाणे आकर्षक आहे, (श्रीकृष्णाच्या स्पर्शामुळे) जी स्वर्गाला कस्पटाप्रमाणे (तुच्छ) करून टाकते, जी तिन्ही लोकांच्या दुःखाचे हरण करते, जिच्या काठांवर अनेक मनोरम वाटिका आहेत, जी आमचा उद्धटपणा नाहीसा करून टाकते, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.   

जले सुरेख सावळी जशी हरीतनू दिसे

हरी जगात सर्व दुःख, स्वर्ग कस्पटा जसे |

तिरी सुरम्य वाटिका मना विशुद्ध जी करी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ १     (मनोहरा – यमुना)


मलापहारिवारिपूरभूरिमण्डितामृता

भृशं प्रपातकप्रवञ्चनातिपण्डितानिशम् ।

सुनन्दनन्दनाङ्गसङ्गरागरञ्जिता हिता

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥२॥

मराठी—दोषांना काढून टाकणारे तुझे जल अमृताने परिपूर्ण आहे. पापी जनांमध्ये असलेली लबाडी सातत्याने दूर करण्यात जी अत्यंत कुशल आहे, (गोकुळाधिपती) नंदाच्या पुत्राच्या संगतीने जी रंगारंग झाली आहे, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

तुझी जले सुधाच, सर्व दोष दूर सारिती

लबाड पातकी जनां सुधारण्या प्रवीण ती ।

अनंगरंगसागरा समेत रंगली खरी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ २    


लसत्तरङ्गसङ्गधूतभूतजातपातका

नवीनमाधुरीधुरीणभक्तिजातचातका ।

तटान्तवासदासहंससंसृता हि कामदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥३॥

मराठी-  जिच्या खळाळत्या, झगमगत्या लाटांच्या स्पर्शाने जीवमात्रांची पापे धुतली जातात, जिच्या किनार्‍यावरील चातक पक्षी भक्तीचा नवा गोडवा चाखतात, किनार्‍यावर एकत्र जमणार्‍या व राहणार्‍या सेवक हंसांसाठी जी इच्छापूर्ती करते, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

करी खळाळता तरंग स्पर्श नष्ट पातकां

नवीन भक्ति गोडवा हि चाखवीत चातकां

तिरी रहात दास हंस, आस त्यां पुरी करी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ ३


विहाररासखेदभेदधीरतीरमारुता

गता गिरामगोचरे यदीयनीरचारुता ।

प्रवाहसाहचर्यपूतमेदिनीनदीनदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥४॥

मराठी- जिच्या शांत तीरावरील वारा (कृष्ण व गोपींच्या) रासक्रीडा, (त्यानंतरचा) विरह आणि उदासीनता यांची आठवण करून देतो, जिच्या पाण्याची शोभा अवर्णनीय आहे, जिच्या संगतीमुळे  पृथ्वी आणि तिच्यावरील लहान-मोठ्या नद्या पवित्र झाल्या आहेत, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

जले अवर्णनीय, शांत वात सांगतो तिरी

विलास रास, अंतराय, खेद आठवे तरी ।

नद्या पवित्र सान थोर संग होत भूवरी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ ४  


तरङ्गसङ्गसैकताञ्चितान्तरा सदासिता

शरन्निशाकरांशुमञ्जुमञ्जरीसभाजिता ।

भवार्चनाय चारुणाम्बुनाधुना विशारदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥५॥

मराठी- सतत लाटांच्या संपर्कात आल्यामुळे जिची वक्राकार वालुकामय पुळण शुभ्र दिसते, शरद ऋतूतील चंद्राचे तेजस्वी किरण जिच्या तीरांची आणि पात्राची स्तुती करतात, जी आपले सुखकारक पाणी सृष्टीच्या पूजनासाठी उपलब्ध करून देण्यात निष्णात आहे, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

सदा सफेद लाट स्पर्श वाळु शोभते तिरी

शशी-प्रकाश शारदीय पात्रकौतुका करी ।

प्रवीण सृष्टिपूजनार्थ सौख्य-नीर दे खरी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ ५


जलान्तकेलिकारिचारुराधिकाङ्गरागिणी

स्वभर्तुरन्यदुर्लभाङ्गसङ्गतांशभागिनी 

स्वदत्तसप्तसप्तसिन्धुभेदनातिकोविदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥६॥

मराठी- राधेच्या अंगीची उटी मिसळल्याने जिच्या पाण्याला रंग चढला आहे, (राधा) आपल्या स्वामीचा (कृष्णाचा) इतरांना दुर्लभ संग, जिच्या पाण्यातून इतरांना वाटून टाकते, गाजावाजा न करता सप्तसिंधु (प्रदेशा) ला हे जल प्रवाहित करण्यात जी निष्णात आहे, अशी कालिन्दाची

कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

 

जलात मौज राधिके उटी प्रवाह रंगवी

अलभ्य संग शौरिचा जनांस सर्व देववी ।    (शौरी- कृष्ण)

प्रवीण पश्चिमेस मूक नीर वाटपा करी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ ६

टीप- ऋग्वेदातील पहिल्या आणि आठव्या मंडलातील उल्लेखांप्रमाणे सात नद्या व सात नद्यांचा प्रदेश या अर्थाने सप्तसिंधू हा शब्द आला आहे. सप्तसिंधू प्रदेश म्हणजे पंजाब व त्याच्या आसपासचा प्रदेश असून, वितस्ता (झेलम), असिक्नी (चिनाब), परूष्णी (रावी), विपाशा (बिआस), शुतुद्री (सतलज), सिंधू व सरस्वती या त्या सात नद्या होत. यमुना नदी या प्रदेशाची पूर्वेकडील सीमा होती.


जलच्युताच्युताङ्गरागलम्पटालिशालिनी

विलोलराधिकाकचान्तचम्पकालिमालिनी ।

सदावगाहनावतीर्णभर्तृभृत्यनारदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥७॥

मराठी- श्रीकृष्णाच्या शरीरावरील (लावलेल्या आणि नदीपात्रात) गळून पडलेल्या उटीकडे आकर्षित झालेले खूप सारे भुंगे जिच्या पात्रावर (घोंघावत) आहेत, (किंवा जणू काही) राधेच्या केसात माळलेल्या चाफ्याच्या फुलांनाच भुंग्यांनी वेढले आहे, जेथे भगवंताचे सेवक (महर्षी) नारद नित्य स्नानासाठी उतरतात, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

 

जली हरी तनू उटी नि राधिका शिरी फुले 

सुगंध खेचता तयास भृंग मालिका झुले ।

मुकुंद भक्त नारदास नित्य स्नान जी करी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ ७


सदैव नन्दनन्दकेलिशालिकुञ्जमञ्जुला

तटोत्थफुल्लमल्लिकाकदम्बरेणुसूज्ज्वला  |

जलावगाहिनां नृणां भवाब्धिसिन्धुपारदा

धुनोतु मे मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥८॥

 

मराठी- जिच्या काठावरील रमणीय साळीच्या वाटिकांमध्ये नंदाचा पुत्र (श्रीकृष्ण) नेहमी खेळत असे, जिचे किनारे मोगरा आणि कदंब फुलांच्या पराग कणांनी चमकतात, जिच्या पाण्यात स्नान करणाऱ्या जनांना जी भवसागरातून पार करते, अशी कालिन्दाची कन्या माझ्या मनाची अशुद्धता नष्ट करो.

 

तिरी सुरम्य साळ वाटिकेत कृष्ण खेळतो

तटी सडा कदम्ब मोगरा पराग शोभतो l

जना जलात नाहता भवाब्धि पार जी करी

मनोहरा मनातली अशुद्धता करो दुरी ॥ ८

 

******************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्रीयमुनाष्टकम् – मराठी अर्थासह

  1. यमुनेची खूप छान माहिती
    तुमच्यामुळे नवीन नवीन छान माहिती मिळते
    मराठीतून अर्थ संस्कृत श्लोकांचा व त्यातून नावीन्यपूर्ण माहिती आमच्या ज्ञानात भर टाकते.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..