यद्यद्वेद्यं तत्तदहं नेति विहाय
स्वात्मज्योतिर्ज्ञानमानन्दमवाप्य।
तस्मिन्नस्मीत्यात्मविदो यं विदुरीशं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१०।।
तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना आचार्य श्री पुढील पुढील टप्प्यांचा विचार आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत.
आरंभी जे जे सर्व दिसते किंवा जाणवते ते सर्व मीच आहे अशी भूमिका मांडली.
त्यात सर्वत्र परमात्मतत्व पाहणे अशी आरंभीची भूमिका आहे. स्वतःला केवळ देहा पुरते न पाहता व्यापक करण्याची भूमिका आहे.
आता त्यापुढील गोष्ट सांगताना म्हणतात,
यद्यद्वेद्यं तत्तदहं नेति – जे जे जाणता येते ते मी नाही.
ज्या गोष्टीला आपण जाणू शकतो ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी असते. माझ्या घराला मी पाहतो याचा अर्थ मी घरापेक्षा वेगळा आहे. हीच गोष्ट सर्व बाह्य पदार्थांना आणि शेवटी मन, बुद्धी पर्यंत चालवत न्यायची आहे.
विहाय – या सगळ्याला सोडून देऊन, या सगळ्या मधील आसक्तीचा त्याग करून.
स्वात्मज्योतिर्ज्ञानमानन्दमवाप्य -तेज ज्ञान आनंद रूप असणाऱ्या स्वतःच्या स्वरूपात व्याप्त होऊन,
तस्मिन्नस्मीत्यात्मविदो यं विदुरीशं – त्या स्वरूपात हेच माझे मूळस्वरूप आहे अशा रीतीने ब्रह्मज्ञानी ज्यांना जाणतात,
अर्थात अशा रीतीने बाह्य गोष्टीतून अंतर्मुख झाल्यावर अंतरंगी असणाऱ्या चैतन्य स्वरूपात ज्यांचे ज्ञान होते त्यांनाच भगवान श्रीहरी असे म्हणतात.
त्या आत्म चैतन्यस्वरूप भगवान श्री विष्णूची स्तुती करतांनाच आचार्य पुढे म्हणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – ज्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीविष्णूंचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply