हित्वाहित्वा दृश्यमशेषं सविकल्पं
मत्वा शिष्टं भादृशिमात्रं गगनाभम्।
त्यक्त्वा देहं यं प्रविशन्त्यच्युतभक्ता
स्तं संसारध्वान्तिविनाशं हरिमी़डे।।११।।
त्या भगवान श्रीहरीच्या भक्तांची जीवन यात्रा कशी असते हे सांगताना आचार्य श्री येथे म्हणत आहेत,
हित्वाहित्वा दृश्यमशेषं सविकल्पं – सर्व विकल्पांच्या सह या संपूर्ण दृष्य जगताला टाळत,टाळत,
यामध्ये तीन टप्प्यांचा विचार महत्त्वाचा आहे. विकल्पांसह त्याग करणे हा पहिला महत्त्वाचा विषय.
विकल्प हेच सर्व दुःखाचे मूळ कारण आहे. एखादी गोष्ट निवडतांना आपल्या समोर जेव्हा अनेक पर्याय असतात तेव्हा त्यांना विकल्प असे म्हणतात. ही विकल्प जितके जास्त तितका निर्णय घेणे कठीण. निर्णय घेण्यास जेवढा उशिर तेवढा वेळ तगमग. एखादी गोष्ट निवडली तरी नंतर मनामध्ये याऐवजी ती घेतली असती तर असा विचार आला तर पुन्हा असमाधान. मग असलेल्या गोष्टीचाही आनंद घेता येत नाही. ही विकल्पांची अडचण जगातल्या कोणत्याही वस्तूला लावून पहा.
त्यामुळे प्रथम सर्व विकल्प सोडणे. एका भगवंता शिवाय आता काही मिळवायचे नाही हा दृढनिश्चय.
मग दृश्य जगाचा त्याग. अर्थात त्यात आसक्त न होणे.
तो त्याग पक्का असायला हवा म्हणून हीत्वा हीत्वा दोन वेळा वापरले.
मात्र अशी आसक्ती सोडली तरीही जग दिसणे बंद होणार नाही. देह आहे तोपर्यंत त्याची जाणीव तर होतच राहणार. मग त्याचे काय करायचे? त्यावर सांगतात,
मत्वा शिष्टं भादृशिमात्रं गगनाभम् – या बाकी सर्व जाणवणाऱ्या गोष्टींना भासमान आकाश समजावे.
ही वेदांताची एक विशिष्ट निरूपण पद्धती आहे. एखादा घडा निर्माण केल्यानंतर त्यामध्ये जी पोकळी असते तिला घटाकाश असे म्हणतात. घर बांधल्यानंतर चार भिंतीच्या आतील जे आकाश ते मठाकाश.
मात्र असे जरी आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात आकाशाचे ती काही तुकडे नाहीत. आकाश एकच आहे सर्वत्र व्याप्त आहे.
ही आलेली मर्यादा तात्कालिक आहे. ज्याक्षणी घडाभर फुटेल त्या क्षणी आकाशात आकाशात मिसळून जाईल. नव्हे खरेतर ते मिसळलेलेच आहे. मधला भेद नष्ट होईल.
हाच नियम देहात असणाऱ्या चैतन्याच्या दृष्टीने विचारात घ्यावा.
देहाची मर्यादा संपली की सर्व चैतन्य एकच परमात्म तत्त्व आहे.
त्यक्त्वा देहं यं प्रविशन्त्यच्युतभक्ता – भगवान श्री हरी चे भक्त अशा पद्धतीने देह सोडून ज्यांच्यामध्ये एकरूप होतात,
स्तं संसारध्वान्तिविनाशं हरिमी़डे- त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply