पश्यञ्श्रृण्वन्नत्र विजानन्रसयन्सं
जिघ्रद्बिभ्रद्देहमिमं जीवतयेत्थम्।
इत्यात्मानं यं विदुरीशं विषयज्ञं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१५।।
या संसारात प्रत्येक गोष्ट करताना त्या सर्व गोष्टींना केवळ आणि केवळ भगवत् चितनाचे अधिष्ठान असावे ही आपल्या संस्कृतीची मूळ शिकवण. त्याच्या भूमिकेला येथे विशद करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
पश्यन् – कोणतीही गोष्ट पाहात असताना,
श्रृण्वन्- कोणत्याही गोष्टीचे श्रवण करीत असताना,
अत्र – येथे या जगात, या संसारात, या आयुष्यात,
विजानन् – कोणतीही गोष्ट जाणून घेत असताना. पंचज्ञानेंद्रियांनी त्या पदार्थाचा अनुभव घेत असताना किंवा मन बुद्धी इत्यादी द्वारे त्यावर विचार किंवा निर्णय करीत असताना.
रसयन् – रसग्रहण करीत असताना. जिभेच्या द्वारे चतुर्विध अन्नपदार्थाचे आणि बुद्धीच्या द्वारे होणारे, दोन्ही प्रकारचे रसग्रहण येथे अपेक्षित आहे.
जिघ्रन् – गंध घेत असताना,
बिभ्रद्देहमिमं – या देहाला धारण करीत असताना.
जीवतयेत्थम्- जीव स्वरूपात या देहाला धारण करताना,
इत्यात्मानं यं विदुरीशं – अशा स्वरूपात यांच्या देवतेला जाणले जाते,
विषयज्ञं – अध्यात्मविषय जाणणाऱ्या लोकांच्या द्वारे,
हा विषय थोडा एकत्रितरीत्या समजून घ्यावा लागेल.
वरील सर्व शारीरिक क्रिया जीव नामक चैतन्याच्या द्वारे केल्या जातात .जीव स्वरूप धारण करून जो परमात्मा म्हणजे जे चैतन्य या देहाला चालवते या स्वरूपात ज्याला जाणले जाते,
अर्थात तो परम व्यापक परमात्मा जीव रूपात या देहात येऊन या देहातील सर्व क्रिया चालवतो. त्या मूळ चैतन्याला जाणावे.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply