ब्रह्मा विष्णू रूद्रहुताशौ रविचन्द्रा
विन्द्रो वायुर्यज्ञ इतीत्थं परिकल्प्य।
एकं सन्तं यं बहुधाहुर्मतिभेदा
त्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।१८।।
परब्रह्म परमेश्वराचे एकमेवाद्वितीय स्वरूप भारतीय दर्शन शास्त्रांच्या विचारांचा आधार आहे. ते परम शुद्ध चैतन्य एकच आहे. मात्र असे असले तरी व्यवहारात किमान अविद्या दशा कायम असेपर्यंत भासमान स्वरूपात का होईना जाणवणाऱ्या द्वैताला भारतीय विचाराने नाकारलेली नाही.
मात्र ते अंतिम तत्त्व नाही हे सांगून त्याच्या अस्तित्वाच्या मर्यादा देखील अधोरेखित केल्या आहेत.
एकदा अशा स्वरूपात भासमान द्वैत स्वीकारले की मग प्रत्येकाला त्याच्या भासानुसार होणाऱ्या अनुभवाचे वेगळेपण देखील सहज स्वीकारता येते.
साधक दशेमध्ये असणारे असे वेगळेपण स्वीकारून त्या-त्या साधकाला त्याच्या त्याच्या मनोवृत्ती नुसार परब्रह्माप्रत नेणारे साधन स्वरूपात वेगळी देवता स्वीकारायला सोय आहे.
अशाच स्वरूपात भारतात विविध दैवतांचे वर्णन करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी अशा विविध दैवतांचे वर्णन हे शेवटी एकाच परब्रह्म परमात्मा चैतन्याचे वर्णन आहे हे निक्षून सांगून वास्तव सत्याला कायमच अधोरेखित करण्यात आले आहे.
तीच भूमिका येथे सांगताना आचार्य म्हणतात,
ब्रह्मा विष्णू रूद्रहुताशौ रविचन्द्रा
विन्द्रो वायुर्यज्ञ इतीत्थं परिकल्प्य – ब्रह्मदेव, विष्णु, शंकर, अग्नी, सूर्य, चंद्र, इंद्र वायू, यज्ञ इत्यादी स्वरूपात कल्पना करून,
एकं सन्तं यं बहुधाहुर्मतिभेदा आपापल्या बुद्धीप्रमाणे ज्या एकाच सत्याला लोक जाणतात,
त्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply