कोशानेतान्पञ्च रसादीनतिहाय
ब्रह्मास्मीति स्वात्मनि निश्चित्य दृशिस्थम्।
पित्रा शिष्टो वेद भृगुर्यं यजुरन्ते
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२०।।
त्या परब्रह्मात विधी न होणे हीच भारतीय संस्कृतीची अंतिम अवस्था आहे. अर्थात एखाद्या गोष्टी पर्यंत जायचे असेल तर कसे आलो? हे समजून घ्यावे लागते. मग त्याच्या विपरीत प्रवास करीत मूळ पदापर्यंत जाता येते.
याला अपवाद न्याय असे म्हणतात. जगताच्या भासमान स्वरूपाला अभ्यासासाठी मान्य केल्यानंतर या जगाची निर्मिती कशी झाली याचे वर्णन शास्त्रात केले आहे.
आपण जीवनदशेला येण्यासाठी पाच कोशांचा आधार घेऊन प्रगत होतो असे शास्त्राने वर्णन केले.
अन्नमय ,प्राणमय ,मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय अशा पाच कोशांचे शास्त्रात वर्णन आहे.
यातील अन्नमय कोशाला स्थूल देह, प्राणमय ,मनोमय आणि विज्ञानमय कोशांना सूक्ष्म देह तर आनंदमय कोशाला कारणदेह असे म्हणतात.
या सर्व उपाधींचा त्याग केल्यानंतर असलेल्या शुद्ध परमात्म्यात विलीन होता येते.
ते सांगताना आचार्य म्हणतात,
कोशानेतान्पञ्च रसादीनतिहाय – या पाच कोशांमधील रस म्हणजे आसक्ती सोडून,
ब्रह्मास्मीति स्वात्मनि निश्चित्य दृशिस्थम् – मी ब्रह्म आहे हे आत्म स्वरूपाच्या ठिकाणी निश्चित करून,
पित्रा शिष्टो वेद भृगुर्यं यजुरन्ते –
भगवान वरुण यांनी उपदेश केल्यानंतर महर्षी भृगु ना चिंतनाच्या शेवटी जे परमतत्व समजले,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply