येनाविष्टो यस्य च शक्त्या यदधीनः
क्षेत्रज्ञोऽयं कारयिता जन्तुषु कर्तुः।
कर्ता भोक्त्तात्मात्र हि यच्छक्त्यधिरूढ
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२१।।
शरीरामध्ये कार्य करणा-या चैतन्याला जीवात्मा असे म्हणतात. तर या संपूर्ण सृष्टीचे संचालन करणाऱ्या परम चैतन्याला परमात्मा असे म्हणतात. जीवात्मा हा या परमात्म्याचाच अंश आहे. त्याचाच अपार क्षमतेच्या आधारे आपल्या मर्यादित चैतन्याच्या आधारे जीवात्मा या देहाचे संचालन करीत असतो. या वास्तविकतेला आचार्य येथे अधोरेखित करीत आहेत.
ते म्हणतात,
येनाविष्टो – तो परमात्माच आपल्या अंश स्वरूप चैतन्याने या देहात समाविष्ट झाल्याने,
यस्य च शक्त्या – ज्याच्या शक्तीच्या आधारावर,
यदधीनः – ज्याच्या अधीन राहून, अर्थात त्याच्याच इच्छेने चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या स्वरूपात कार्य करून,
क्षेत्रज्ञोऽयं – हा क्षेत्रज्ञ म्हणजे जीवात्मा. शास्त्रात देहाला क्षेत्र असे म्हणतात. या देहात राहणाऱ्या चैतन्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात.
या देहातील सर्व जड अवयवांचे संचालन या क्षेत्रज्ञ अर्थात जीव चैतन्याच्या आधारे होत असते.
मात्र असे असले तरी त्याचे हे चैतन्य मर्यादित स्वरूपातील आहे. हे मर्यादित चैतन्य अमर्याद परमात्म चैतन्याचा अंश आहे, त्या भगवान श्रीहरीच्या शक्तीनेच हा क्षेत्रज्ञ सर्व कार्य करतो, असे आचार्य श्री येथे स्पष्ट करीत आहेत.
कारयिता – सर्व कार्य करवून घेणारा होतो.
जन्तुषु कर्तुः – विविध देहांचा कर्ता वाटतो.
कर्ता भोक्त्तात्मात्र हि यच्छक्त्यधिरूढ – मात्र त्याचेही कर्तृत्व, भोक्तृत्व केवळ आणि केवळ ज्यांच्या शक्ती वरच आधारलेले आहे, वास्तविक त्यांचेच आहे,
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या भगवान श्रीहरींचे मी स्तवन करतो.
प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply