यस्यातर्क्यं स्वात्मविभूतेः परमार्थं
सर्वं खल्वित्यत्र निरुक्तं श्रुतिविद्भिः।
तज्जातित्वादब्धितरङ्गाभमभिन्नं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२५।।
या संपूर्ण जगामध्ये व्याप्त असणाऱ्या त्या परमात्मा चैतन्याचे स्वरूप कसे आहे ते सांगताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणताहेत,
यस्यातर्क्यं – ज्याचे अतर्क्य असे स्वरूप, येथे भगवंताला अतर्क्य म्हटले आहे. तो तर्कांनी प्राप्त होऊ शकत नाही. तर्क नेहमी बाह्य अनुभूती जन्य असतो. अनुभूती सगुण-साकार बाह्य पदार्थांची घेता येते. या दृष्टीने भगवान बाह्य अनुभूतीचा विषय नसल्याने तो तर्काचा विषय होऊ शकत नाही. वेगळ्या शब्दात त्याला बाहेरून समजून घेता येत नाही.
स्वात्मविभूतेः- आत्मानुभूती हाच त्या परमात्म्याच्या साक्षात्काराचा एकमेव मार्ग आहे.
परमार्थं – परमात्म्याची प्राप्ती हाच माणसाचा सगळ्यात मोठा प्राप्तव्य विषय आहे.
सर्वं खल्वित्यत्र निरुक्तं श्रुतिविद्भिः – श्रुतीच्या जाणकारांनी अर्थात वेदविद्या मंडित ज्ञानवंतांनी “सर्व खल्विदं ब्रह्म ! ” अशा स्वरूपात त्याचे स्वरूप कथन केले आहे.
तज्जातित्वादब्धितरङ्गाभमभिन्नं – तो अदृश्य परमात्माच समुद्राच्या तरंगांप्रमाणे अभिन्नत्व राखत दृश्यमान होतो.
हे विवेचन मोठे चिंतनीय आहे. जसा समुद्रापेक्षा तरंग वेगळा नसतो पण पाहणाऱ्याला तो वेगळा दिसतो तसे हे जग भगवंता पेक्षा वेगळे भासत असले तरी त्या स्वरूपात भगवानच लीला करीत आहेत.
अशा स्वरूपात अदृश्य असूनही जगाच्या रूपात दृश्य होणाऱ्या,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररुपी अंधकाराचा विनाश करणार्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply