युक्त्यालोड्य व्यासवचांस्यत्र हि लभ्यः
क्षेत्रक्षेत्रज्ञान्तरविद्भिः पुरुषाख्यः।
योऽहं सोऽसौ सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२८।।
त्या परमात्म्याला स्वतःच्या अंतरंगात आणि आपल्याला त्याच्या चैतन्याच्या अंशरुपात कशाप्रकारे समजून घ्यायचे? त्याचे निरूपण करताना आचार्य श्री पुढे म्हणतात,
युक्त्यालोड्य – युक्ती अर्थात शास्त्रशुद्ध पद्धतीने, आलोड्य अर्थात पाहून, उमजून ,घेऊन समजून घेऊन.
अर्थात शास्त्रांमध्ये ज्या पद्धतीने त्या तत्वाला समजून घेण्याची रीती वर्णन केलेली आहे त्या पद्धतीने त्याला समजून घेऊन.
परमात्मा हा केवळ पाहण्याचा विषय नाही तर तो समजून घेण्याचा विषय आहे.हे येथे सगळ्यात महत्त्वाचे.
सामान्य ज्ञानेंद्रियांनी त्याला पाहता-ऐकता इत्यादी येत नाही हे बरोबर आहे. पण याच इंद्रियांनी प्राप्त होणाऱ्या संवेदना यांच्या माध्यमातून, या सर्व गोष्टींच्या मागे असणारी चैतन्य शक्ती स्वरूपात त्याला जाणता येते.
जसे झाडाचे पान हलताना दिसते. त्याला हलवणारा वायु दिसत नसला तरी, पानाच्या हलण्यावरून वायूच्या अस्तित्वाची जशी जाणीव होते तसे या जड सृष्टीतील चलनवलन पाहून त्यामागील चैतन्य भगवंताची जाणीव करून घेता येऊ शकते.
व्यासवचांस्यत्र हि लभ्यः- ही जाणीव भगवान व्यासांच्या वाणीतून होते हे म्हणत असताना आचार्य श्री वेद पुराणां कडे लक्ष वेधत आहेत.
त्यात वर्णित विषयांच्या द्वारे असे भगवंताला जाणता येते.
क्षेत्रक्षेत्रज्ञान्तरविद्भिः पुरुषाख्यः- त्या शास्त्राच्या आधारे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील फरक जाणून घेऊन, क्षेत्रज्ञ स्वरूपात ज्या पुरुषाला, परमात्म्याला जाणले जाते,
योऽहं सोऽसौ सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं – ज्ञानी लोक झाला तो हा आहे आणि मी तोच आहे असे जाणतात, अर्थात क्षेत्रज्ञ तोच परमात्मा आहे आणि मी तेच चैतन्य आहे हे जाणतात.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसाराचा विनाश करणार्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply