एकीकृत्यानेकशरीरस्थमिमं ज्ञं
यं विज्ञायेहैव स एवाशु भवन्ति।
यस्मल्ँलीना नेह पुनर्जन्म लभन्ते
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२९।।
आपल्या शरीरात विद्यमान असणाऱ्या चैतन्य शक्तीलाच भगवान रूपात जाणल्यानंतर, ती जाणीव अधिक व्यापक करीत विश्व चिंतन कसे करता येते? च्या स्वरूपात वैश्वरूप दर्शन कसे घेता येते? ते आचार्यश्री प्रस्तुत श्लोकात विशद करून सांगत आहेत.
एकीकृत्यानेकशरीरस्थमिमं ज्ञं
अशा स्वरूपातील या ज्ञ म्हणजे सर्व काही जाणणाऱ्या ज्ञानरूप चैतन्याला, जे अनेक शरीरातील त्याच्या अस्तित्वाला एकत्रितरीत्या जाणतात.
अर्थात जसे माझ्या शरीरातील चैतन्य परमात्म तत्व आहे तसे प्रत्येक शरीरातील चैतन्य हे त्याच परमात्म्याचे विलसन आहे . अर्थात प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये तोच भरलेला आहे. जरी ते प्रगटीकरण देह सापेक्ष वेगवेगळे वाटत असले तरी ज्याप्रमाणे दिव्यातून प्रकाश, पंख्यातून वारा, फ्रीजमधून थंडी तर हिटर मधून गर्मी असे प्रगटीकरण बदलत असले तरी त्या सगळ्याच्या मागे असणारी विद्युत् शक्ती एकच असते त्याप्रमाणे या सर्व देहामध्ये विलास करणारा परमात्मा अंतिमत: एकच आहे.
यं विज्ञायेहैव स एवाशु भवन्ति – त्याला जाण्यानंतर जीव त्याच रूपाचा होऊन जातो.
देव पहायासी गेलो ! देव होऊनीया ठेलो! ही संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबारायांची स्वानुभव सिद्ध ऊक्ती याच अवस्थेचे प्रगटीकरण आहे.
यस्मल्ँलीना नेह पुनर्जन्म लभन्ते- ज्याच्या मध्ये लीन झाल्यानंतर पुन्हा या जगात जन्म घ्यावा लागत नाही.
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply