योऽयं देहे चेष्टयितान्तःकरणस्थः
सूर्ये चासौ तापयिता सोऽस्म्यहमेव।
इत्यात्मैक्योपासनया यं विदुरीशं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३१।।
एकदा असे ऐक्य जाणवल्यानंतर सर्वत्र कशी आत्मरूपाचीच प्रचीती येत राहते, त्याचे विलोभनीय वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
योऽयं देहे चेष्टयितान्तःकरणस्थः – जो या देहात राहून अंतःकरणातून सर्व क्रियांचे संचालन करतो.
अर्थात जे चैतन्या देहामध्ये निवास करते, ज्याच्या आधारे जड असणारा हा देह विविध क्रियाकलाप करीत असतो. विविध संवेदना ग्रहण करतो. त्याआधारे सुख किंवा दुःखांचा अनुभव घेतो. त्याअंतर्गत चैतन्याला सर्वप्रथम जाणता येते.
मग चैतन्यस्वरूप कळल्यानंतर या जाणिवेची व्याप्ती अधिक विशाल होते.
सूर्ये चासौ तापयिता सोऽस्म्यहमेव- सूर्यामध्ये तापवणारा जो आहे तो मीच आहे. अशा स्वरूपात साधकाला या विश्वातील प्रत्येक संचलनाच्या मागे असणाऱ्या संचालक शक्तीच्या स्वरूपाची जाणीव होते. ते स्वरूप हेच आपले आत्मरूप असल्याचे त्याला यथार्थ रीतीने उमगते.
अर्थात पहिल्यांदा त्या चैतन्याची अनुभूती देहापुरती घेता येते. एकदा देहाचा संचालना मागील चैतन्य जाणवले की मग तेच चैतन्य सर्व विश्वाची ही संचालन करीत आहे अशी व्यापक जाणीव होऊ शकते.
अशा स्वरूपात जे पिंडी ते ब्रह्मांडी या शास्त्र वचनाचा यथार्थ अनुभव त्या साधकाला प्राप्त होतो.
इत्यात्मैक्योपासनया यं विदुरीशं
– अशा ऐक्य उपासना माध्यमातून अर्थात अशा स्वरुपात सर्वत्र विद्यमान चैतन्याचे व्यापकत्व जाणल्यानंतर, ते चैतन्य हेच ज्यांचे स्वरूप आहे, अर्थात अशा स्वरूपात जे सर्व विश्वाचे संचालन करतात, पालन करतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा नाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply