विज्ञानांशो यस्य सतः शक्त्यधिरूढो
बुद्धिर्बुध्यत्यत्र बहिर्बोध्यपदार्थान्।
नैवान्तःस्थं बुध्यति यं बोधयितारं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३२।।
त्याप्रमाणे त्याचे स्वरूप वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात , ” यो बुद्धे: परतस्तु स:!” अर्थात तो परमात्मा बुद्धीच्या पार आहे. बुद्धीने त्याला जाणता येत नाही. याचे कारण आणि बुद्धीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
विज्ञानांशो यस्य सतः शक्त्यधिरूढो बुद्धि: – त्या सत्यस्वरूप परमात्म्याच्या अधिष्ठानावर कार्य करणारा जो विज्ञानाचा अंश त्यालाच बुद्धी असे म्हणतात.
येथे विज्ञान शब्द व्यवस्थित समजून घ्यायला हवा. त्यात विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान असा अर्थ नाही. ज्ञान तेथे विकल होते म्हणजे गळून पडते , त्या अवस्थेला विज्ञान असे म्हणतात.
येथे ज्ञान शब्दाचा अर्थ बाहेरून येणाऱ्या संवेदना. त्या संवेदनां साठी संकल्प विकल्प स्वरुपात काम करते ते मन.
त्यावर जी निर्णय घेते तिला बुद्धी असे म्हणतात.
तेथे संवेदना मुळे निर्माण होणाऱ्या संकल्प विकल्पाना विराम मिळतो या अर्थाने तिला विज्ञान असे म्हणतात.
या संवेदना बाहेरून येणाऱ्या असल्याने बुद्धीचे स्वरूप या संवेदनांकडे या अर्थाने बहिर्मुख असते.
र्बुध्यत्यत्र बहिर्बोध्यपदार्थान् – अशा रीतीने ही बुद्धी बहिर्मुख स्वरूपात बाह्य पदार्थांचा बोध करून देते. अर्थात पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून शब्द स्पर्शादि रस ग्रहण करत पदार्थांचे ज्ञान करून देते.
नैवान्तःस्थं बुध्यति यं बोधयितारं
– मात्र तिच्या आत राहणाऱ्या, या बोधाला जाणवून देणाऱ्या, परमात्म्याला जाणू शकत नाही.
या अर्थाने त्याला बुद्धीच्या पार म्हटले आहे. असा तो जो परमात्मा,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply