कोऽयं देहे देव इतीत्थं सुविचार्य
ज्ञाता श्रोता मन्तयिता चैष हि देवः।
इत्यालोच्य ज्ञाशं इहास्मीति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३३।।
परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग विशद करताना आचार्य श्री आपल्यासमोर वेगवेगळ्या अंगाने निरूपण करीत आहेत.
त्या परमात्म्याला अंतरंगी कसे जाणावे? याचे निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात,
कोऽयं देहे देव इतीत्थं सुविचार्य – या देहात कोणता देव आहे याचा शांतपणे विचार करावा.
आपल्या या दृश्य देहाला जड असे म्हणतात.
थोडा वेगळा उच्चार केला तर त्यातील जडपणा असा भाव लक्षात येतो. ते भारी पण व्यक्ती गेल्यावर जाणवते. या देहाला उचलायला चार लोक लागतात. ते ही बदलत राहतात. इतका जड असलेला हा देह एका क्षणात उठून उभा राहतो. अनेक प्रकारची कार्य. या सगळ्याला आधार देणारी आतील शक्ती कोणती? असा विचार केला की देहाच्या आत राहणारा तो देही, क्षेत्राच्या आत राहणारा तो क्षेत्रज्ञ, जाणता येतो.
तशा स्वरूपात त्याला जाणावे. असे आचार्य येथे सांगत आहेत.
ज्ञाता श्रोता मन्तयिता चैष हि देवः – जाणणे, ऐकणे ,मनन करणे हे सर्व तू दैवच करतो.
यात ऐकणे शब्दाचा संबंध शारीरिक आहे. मनन करण्याचा संबंध मानसिक तर जाण्याचा संबंध बौद्धिक स्तरावर चा आहे.
या तीनही स्तरांवर चालणारे प्रत्येक कार्य यातील गुणांचा पार असणारा, गुणत्रयातीत परमात्मा करतो. हे जाणून घ्यावे.
इत्यालोच्य ज्ञाशं इहास्मीति विदुर्यं – असे पाहून त्या ज्ञ तत्त्वाचा मी एक अंश आहे अशा स्वरूपात ज्याला जाणले जाते,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply