प्राणो वाहं वाक्छ्रवणादीनि मनो वा
बुद्धिर्वाहं व्यस्त उताहोऽपि समस्तः।
इत्यालोच्य ज्ञप्तिरिहास्मीति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३५।।
स्वतःचे आत्मस्वरूप समजून घेण्यासाठी, त्या आत्मस्वरूपात अंश रूपात निवास करणाऱ्या परमात्म्याला जाणून घेण्यासाठी, ज्या वेगवेगळ्या पद्धतीची विचारसरणी अंतरी बाणवावी लागते त्याचा विचार करताना आचार्य श्री म्हणतात,
प्राणो वाहं – मी प्राण आहे का?
असा प्रश्न जेथे जेथे आपल्याला चैतन्य जाणवते तेथे विचारावा.
इथे प्राण शब्दाचा संबंध श्वासोच्छवासाची आहे. आपल्या चैतन्याची ती प्रथम ओळख आहे. बाहेरच्या ला सुद्धा त्याच्याच आधारे आपल्या चैतन्याची जाणीव होते. ज्या क्षणी हे श्वास थांबतात त्या क्षणी व्यक्तीचा लौकिक मृत्यू मानला जातो. त्यामुळे चैतन्याचे हे प्रगटीकरण म्हणजे मी आहे का? असा पहिला प्रश्न येतो.
पुढे विचार करताना,
वाक्छ्रवणादीनि मनो वा – वाक् म्हणजे वाणी, श्रवण म्हणजे कान किंवा मन इत्यादी म्हणजे मी आहे का? असे पुढचे प्रश्न येतात.
त्या त्या स्थानी आपल्याला चैतन्याची जाणीव होते. मी चैतन्य आहे म्हणल्यावर त्या त्या स्थानी चैतन्य जाणवत असल्याने ते म्हणजे मी का? असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्याही पुढे
बुद्धिर्वाहं – किमी म्हणजे बुद्धी आहे? शेवटी
व्यस्त उताहोऽपि समस्तः- मी या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे की या सगळ्या तच आहे? असे त्या साधकाचे चिंतन चालते.
या प्रत्येक गोष्टीला आपण माझी असे म्हणतो. माझा श्वास पासून माझी बुद्धी पर्यंत. जी गोष्ट माझी असते ती माझ्या पेक्षा वेगळी असते. या दृष्टीने तो साधक या सगळ्यांपेक्षा वेगळा असतो आणि या सगळ्यांमध्ये त्याचेच चैतन्य असते.
इत्यालोच्य ज्ञप्तिरिहास्मीति विदुर्यं – असे सर्व पाहून या सगळ्याचा जाणकार, द्रष्टा स्वरूपात बुद्धिमान लोक ज्या तत्वाला जाणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply