नाहं प्राणो नैव शरीरं न मनोऽहं
नाहं बुद्धिर्नाहमहंकारधियौ च।
योऽत्र ज्ञांशः सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३६।।
प्राणापासून बुद्धी पर्यंत सर्वत्र चालणारा चैतन्याचा विलास पाहिल्यानंतर त्या प्रत्येक जागी आत्मस्वरूपाचा विचार करून, चिंतन करणार्या साधकाला त्या त्या स्थानी असणाऱ्या मर्यादेची देखील जाणीव होते.
उदाहरणार्थ प्राण म्हणजे चैतन्य म्हणावे तर त्यांचे आवागमन चालत असते. शरीरात त्यांचे प्रमाण कमी किंवा जास्त होते. काही भागात प्राण अर्थात वायू दाटून राहतो. काही भागातील प्राण म्हणजे चलनवलन शक्ती नष्ट होते. अशा प्रकारचे विविध विकार प्राणांच्या ठिकाणी संभवतात. या दृष्टीने विचार केला तर जे विकारशील आहे ते आत्म चैतन्य असू शकत नाही यादृष्टीने प्राण म्हणजे आत्मा नाही हे सिद्ध होते.
अशा स्वरूपात अन्य सर्व तत्त्वांचा विचार ज्यावेळी साधक करतो त्यावेळी त्याची जी भूमिका असते ती भूमिका मांडताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात,
नाहं प्राणो – मी प्राण नाही
नैव शरीरं – ना शरीर आहे
न मनोऽहं- ना मी मन आहे.
नाहं बुद्धिर्नाहमहंकारधियौ च – ना मी बुद्धी आहे. ना मला कळले या स्वरूपातील बुद्धीच्या ठिकाणी निवास करणारा अहंकार मी आहे.
योऽत्र ज्ञांशः सोऽस्म्यहमेवेति विदुर्यं – या सगळ्यांची ज्याला जाणीव होते तो चैतन्य अंश मी आहे, अशा स्वरूपात साधक ज्याला जाणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे- त्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply