सत्तामात्रं केवलविज्ञानमजं स
त्सूक्ष्मं नित्यं तत्त्वमसीत्यात्मसुताय।
साम्नामन्ते प्राह पिता यं विभुमाद्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३७।।
प्राणापासून बुद्धी पर्यंत विचार करत असताना या प्रत्येक जागी जरी चैतन्याचा आविष्कार दिसत असला तरी तो प्रतिबिंब रूप आहे. ते माझे स्वरूप नाही. अशाप्रकारे निश्चिती झालेल्या त्या साधकाला आत्मतत्वाचे घ्याल अशा नकारात्मक स्वरुपात होणे उपयोगाचे नाही .
त्या ठिकाणी असणारी आसक्ती काढून घेण्यासाठी ते म्हणजे मी नाही अशा प्रकारे उपदेश केलेला आहे. पण यातून फक्त काय नाही ते कळते. हे ज्ञान नकारात्मक झाले. आत्मतत्त्व काय नाही ही कळण्यासोबत ते काय आहे हे सांगणारी रचना सकारात्मक ज्ञान. साधकाला आत्मतत्वाचे ज्ञान अशाप्रकारच्या कोणत्या सकारात्मक स्वरूपात होते त्याचे वर्णन करताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणतात,
सत्तामात्रं – शुद्ध अस्तित्व असलेले. सत् शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. मात्र म्हणजे केवळ अस्तित्व. कशावरही अवलंबून असलेले आणि कशासाठीही इच्छा नसलेले परम तृप्त, आत्मतृप्त असे तत्त्व.
केवलविज्ञानम् – केवळ ज्ञान स्वरूप. विज्ञान शब्दाचा अर्थ जसा बाहेरच्या जगाचे विशेष ज्ञान असा होतो त्याचप्रमाणे अध्यात्म शास्त्रात विज्ञान म्हणजे सर्व ज्ञान अर्थात संवेदना गळून गेल्यानंतर बाहेर नव्हे तर आत मध्ये होणारी अस्तित्वाची जाणीव.
अजं – जे तत्व कधी जन्माला आलेलेच नाही. पर्यायाने त्याच्या मृत्यूचा संबंधच नाही. असे ते परम शाश्वत, सनातन ,चिरंतन तत्त्व.
स: – ते तत्व. की जे,
सूक्ष्मं नित्यं – सूक्ष्म, नित्य
तत्त्वमसीत् – तत्व आहे.
अशा स्वरूपात,
आत्मसुताय साम्नामन्ते प्राह पिता – सामवेदाच्या अंती अर्थात छांदोग्य उपनिषदात भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या पुत्राला म्हणजे प्रजापतीला सांगितले.
यं विभुमाद्यं – त्या परम व्यापक असणाऱ्या आद्य तत्वाचे
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसार रुपी अंधकाराचा नाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply