मूर्तामूर्ते पूर्वमपोह्याथ समाधौ
दृश्यं सर्वं नेति च नेतीति विहाय।
चैतन्यांशे स्वात्मनि सन्तं च विदुर्यं
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३८।।
भगवंताच्या चरणी विलीन होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे शास्त्राने सुस्पष्टरीत्या सांगितले आहे.
त्यागाच्या या रचनेत शब्दच सर्वस्व असा आहे. यात प्रथम सर्व गोष्टींचा त्याग करावा लागतो. त्यानंतर स्व चा देखील त्याग करावा लागतो. त्याच वेळी परमात्म तत्त्वाची प्राप्ती होते. हीच प्रक्रिया उलगडून दाखवताना आचार्य श्री म्हणतात,
मूर्तामूर्ते पूर्वमपोहि – सर्वप्रथम सर्व मूर्त आणि अमूर्त गोष्टींचा त्याग करावा लागतो.
येथे मूर्तचा अर्थ पंचज्ञानेंद्रिय यांच्याद्वारे ज्याची अनुभूती घेता येते असे पदार्थ.
सर्वप्रथम त्यांच्या त्यागाचा विचार येतो. अर्थात यांच्यातील आसक्ती कमी करावी लागते.
त्यानंतर अमूर्त म्हणजे ते विषय समोर असली तरी त्यांच्या प्राप्तीचे जे चिंतन चालते त्याचा त्याग करावा लागतो.
बाह्य त्याग अनेकदा तुलनेने सोपा ठरतो. मात्र त्या सोडलेल्या गोष्टीचे मनात चिंतन चालत असेल तर ते सोडणे केवळ वरपांगी ठरते.
अशा स्वरूपात मूर्त आणि अमूर्त दोघींचा त्याग करायला हवा.
अथ समाधौ दृश्यं सर्वं नेति च नेतीति विहाय – त्यानंतर समाधी तसे मध्ये सर्व भासमान गोष्टींना हे नाही. हे नाही. असे करत आपल्यापासून दूर करावे लागते.
अर्थात यापैकी कशानेही मला शाश्वत चिरंतन सुख मिळणार नाही या अटल विश्वासाने यांच्यात आसक्त होणे टाळावे लागेल.
चैतन्यांशे स्वात्मनि सन्तं च विदुर्यं – अशा स्वरूपात सर्व बाह्य गोष्टींचा त्याग केल्यावर अंतरंगात ज्या चैतन्य स्वरूप अस्तित्वाला जाणतात,
तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – त्या संसाररूपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरींचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply